विवेक चांदूरकर/ अकोलासमाज आणि कुटुंबाचा तीव्र विरोध, शेती अवघी पाच हजार चौरस फुट आणि गुंतवणुकीसाठी केवळ ४८0 रूपये.. अशा प्रतिकूल परिस्थितीत केनियातील एका महिलेने फुलवलेल्या फूलशेतीचे उत्पादन इंग्लंड आणि हॉलंडपर्यंत जाऊन पोहोचले आहे. फुलांची निर्यात करणार्या या महिलेचा आदर्श केनियातील इतर महिलांनीही घेतला. तिच्या गावातील अनेक शेतकरी आता या महिलेकडून फूलशेतीचे धडे घेताहेत.केनियामध्ये मुख्यत्वे पुरूषच शेती करतात. या देशात महिलांनी शेती करण्याचा पायंडा पाडणार्या डिसेंटाची यशोगाथा डॉ. पंजाबराव देशमुख कृषि आयोजित आंतरराष्ट्रीय परिसंवादात सहभागी झालेल्या १२ देशातील शेतकर्यांनी ऐकली आणि सर्वजण थक्क झाले. केनियात राहणारी डिसेंटा वॉन्जड् वयाच्या अठराव्या वर्षीच कायद्याची पदवी घेत होती; मात्र त्यावेळी तिने शेती करण्याचा निर्णय घेतला. केनियामध्ये केवळ पुरूषच शेती करतात. त्यामुळे तिचा निर्णय आई- वडिलांसाठी धक्कादायक होता. त्यांनी तिला विरोध केला; मात्र डिसेंटाने शेती करण्याचा हट्ट धरला. त्यावेळी तिला तिच्या आईने ५ हजार चौरस फूट शेत व ५00 केनियन शिलींग (भारतीय चलनात ४८0 रूपये) गुंतवणुकीसाठी दिले. एवढय़ा तुटपुंज्या गुंतवणुकीवर तिने फुलांची शेती करण्याला सुरूवात केली. ती स्वत: डोक्यावर पाण्याच्या घागरी नेवून झाडांना पाणी देत होती. गावातील महिला, पुरूष तिच्यावर हसत होते. शेती हे महिलांचे काम नाही, असे तिच्या आई वडिलांना सांगत होते; मात्र, गावकर्यांच्या विरोधाने डिसेंटा आणखी जिद्दीला पेटली.लोकमतशी बोलताना डिसेंटा वॉन्जड् यांनी सर्वांचा विरोध झुगारून शेती करायला सुरूवात केल्याचे सांगीतले. महिलांनी शेती करणे हे केनियातील लोकांसाठी आश्चर्यकारक होते; मात्र मला त्यामध्ये यश मिळाले. मी अन्य महिलांनाही शेती करण्यास प्रवृत्त केले. आपल्याजवळ असलेला पैसा चांगल्या कल्पना सूचवू शकत नाही; पण चांगल्या कल्पनेतून आपल्याला बराच पैसा मिळू शकतो, हा संदेश मला जगातील महिलांना द्यायचा असल्याचे त्या म्हणाल्या.
जिद्दीपुढे आकाशही ठेंगणे!
By admin | Updated: December 10, 2014 00:03 IST