अकोला जुने शहरात ध्वज काढण्यावरून तणाव
By Admin | Updated: January 13, 2015 01:34 IST2015-01-13T01:32:13+5:302015-01-13T01:34:22+5:30
कडेकोट पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम, नागरिकांची नारेबाजी.

अकोला जुने शहरात ध्वज काढण्यावरून तणाव
अकोला - अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान जुने शहरातील कस्तुरबा गांधी रुग्णालयानजीक लावण्यात आलेला ध्वज काढण्यासाठी तणाव निर्माण झाला होता. तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आल्यानंतर नागरिकांनी पुढाकार घेऊन स्वत:च ध्वज काढला. त्यानंतर अतिक्रमण हटाव पथकाने या ठिकाणचा ओटा उद्ध्वस्त केला. पोलीस प्रशासन व महापालिकेकडून संयुक्त मोहीम राबवून अतिक्रमण हटविण्यात येत असून, सोमवारी जुने शहरातील डाबकी रोडवरील अतिक्रमण काढण्यात आले.
नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून पोलीस आणि मनपा प्रशासनाच्यावतीने अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान शासकीय व खासगी जागांवर लावण्यात येत असलेले ध्वज, फलक काढण्यात येत आहेत. ही विशेष मोहीम सोमवारी डाबकी रोडवरील फलक, ध्वज व इतर साहित्य काढण्यासाठी राबविण्यात आली असून, या रोडवर लावण्यात आलेले ध्वज, संत महंतांचे फोटो, फलक काढण्यात आले. डाबकी रोडवर मोठय़ा प्रमाणात फोटो, ध्वज व फलक लावण्यात आल्याने या रोडवर ही मोहीम राबविण्यास पोलीस व मनपा प्रशासनाला प्रचंड अडचण निर्माण झाली होती. कस्तुरबा गांधी रुग्णालय चौकात लावण्यात आलेला एक ध्वज काढण्यासाठी परिसरातील महिलांनी पथकाला अडविण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलीस व मनपा प्रशासनाने ध्वजाची परवानगी मागितली असता येथील नागरिकांनी परवानगीचा कागद जळाल्याचे पथकाला सांगितले. त्यानंतर या पथकाने परवानगीचे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी ४ वाजेपर्यंत वेळ दिला, त्यानंतरही परवानगीचे पत्र न दिल्याने या पथकाने तगडा पोलीस बंदोबस्त लावल्यानंतर आणि इतर समाजाचे फलक काढल्यानंतर परिसरातील महिला व नागरिकांनी स्वत: पुढाकार घेऊन हा ध्वज काढला. त्यामुळे तणावाचे वातावरण निवळले. विविध समाजातील नागरिकांचे गट समोरा-समोर आल्याने या ठिकाणी नारेबाजी करण्यात आली. पोलीस व मनपा प्रशासनाने परिसरातील नागरिकांना शांततेचे आवाहन केल्यानंतर नागरिकांनी नारेबाजी बंद केली. या चौकात राबविण्यात आलेल्या मोहिमेमुळे डाबकी रोडवरील वाहतूक विस्कळीत झाली होती.