एका आईच्या संघर्षाची गोष्ट..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2017 04:19 IST2017-05-14T04:19:16+5:302017-05-14T04:19:16+5:30
मोलमजुरी करून मुलांना केले उच्च शिक्षित, मुला-मुलींना बनविले अभियंता, शिक्षक.

एका आईच्या संघर्षाची गोष्ट..
नितीन गव्हाळे
अकोला : राहायला घर नाही. गरिबी पाचवीलाच पुजलेली. अशा परिस्थितीत, एक आई आपल्या मुलांना मोठे करण्यासाठी धडपड करीत होती. आई शेतमजुरी आणि बाबांनी चौकीदारी करून अनंत हालअपेष्टा, उपेक्षा सहन करीत मुला-मुलींना मोठे केले. त्यांना कर्तबगार बनविले आणि मुलांनी तिला विमानातून फिरवून फॉरेन दाखविले. आज ही मुले या माउलीचा आधार झाली आहेत. चारपैकी तीन मुले-मुली अभियंता, शिक्षिका आणि शासकीय कर्मचारी झाली आहेत.
शशिकलाबाई मुरलीधर गवई. बोरगाव मंजूतील सिद्धार्थ नगरात त्या राहतात. दोघेही पती-पत्नी अल्पशिक्षित. घरची परिस्थिती अत्यंत नादारीची. चार मुले, कल्पना, अलका, भारत आणि धाकटा शरद. मुलांनी शिकावं, मोठ व्हावं, नाव कमवावं असं या माउलीला मनापासून वाटे. मुलांना मोठं करण्यासाठी या आई-वडिलांनी रक्ताचं पाणी केलं. शेतमजुरी केली. म्हशी राखल्या, शेण काढलं. रात्री-बेरात्री चौकीदारी केली, दुसर्याच्या शेतात पाणी दिलं. दिव्याच्या मंद प्रकाशात, चुलीवर भाकरी थापून या माउलीने मुलं घडवली. थोरली कल्पना हिला पदवीधर केले. अलकाला डीएड केलं. भारत याला नझूल खात्यात नोकरीला लावलं आणि शरदला बीई सिव्हिल इंजिनिअर बनवलं. अलकाताई भारत विद्यालयात शिक्षिका आहेत, तर शरद हा मॉरिशस देशात अभियंता म्हणून काम करतो. शशिकलाबाईने केलेल्या संघर्षाची आज फुले झाली आहेत. राहायला पक्कं घर, शेतीवाडी, पुण्यात धाकट्याचे घर, आता घरात आनंदीआनंद आहे. काही वर्षांपूर्वीच शशिकलाबाई विमानाने बसून फॉरेन(अर्थात मॉरिशस) फिरून आल्या. मुलांनीही आईने केलेल्या कष्टाची जाणीव ठेवत, तिला समदं फॉरेन दाखविलं. शशिकलाबाईंचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. आपल्या कष्टाचं सार्थक झाल्याची साक्ष या माउलीचे पाणावलेले डोळे देत होते.