सराफा व्यावसायिकांचा रास्ता रोको

By Admin | Updated: March 29, 2016 02:22 IST2016-03-29T02:22:24+5:302016-03-29T02:22:24+5:30

एक्साइज ड्युटीला विरोध; धिंग्रा चौकात घोषणाबाजी.

Stop the way of bullion professionals | सराफा व्यावसायिकांचा रास्ता रोको

सराफा व्यावसायिकांचा रास्ता रोको

अकोला: सराफा व्यावसायिकांवर लादण्यात आलेला एक्साइज ड्युटीचा निर्णय सरकारने मागे घ्यावा, या मागणीसाठी अकोला जिल्हा सराफा असोसिएशनच्या वतीने सोमवार, २८ रोजी सायंकाळी ५.३0 वाजता मध्यवर्ती बसस्थानकासमोरील धिंग्रा चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी जमलेल्या शहर तथा जिल्हय़ातील सराफा व्यावसायिकांनी एक्साइज ड्युटीला विरोध दर्शवित शासनाविरुद्ध घोषणाबाजी केली. परिणामस्वरूप, अर्धा तास शहर वाहतूक खोळंबली होती. एक्साइज ड्युटी लावण्याविरुद्ध देशव्यापी सराफा संघटनांनी गेल्या २ मार्चपासून देशव्यापी बंद पुकारला. अकोला जिल्हा सराफा असोसिएशनच्या आव्हानाला पाठिंबा दर्शवित शहर तथा जिल्हय़ातील सर्व सराफा व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली आहेत. २३ मार्च रोजी सरकारने या निर्णयाची अंमलबजावणी करताना सराफा व्यावसायिकांना कुठलाच त्रास होणार नाही, याची ग्वाही दिली; मात्र निर्णयाच्या जाचक अटी सर्वसामान्य सराफा व्यावसायिकांना बेरोजगारीच्या दिशेने वाटचाल करावयास लावणार्‍या असल्याने सरफा व्यावसायिकांनी बंद कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. या देशव्यापी बंदला सोमवारी २७ दिवस पूर्ण झाले. महिना होत आला असतानासुद्धा सरकार आपल्या निर्णयावर ठाम असल्याने, एक्साइज ड्युटीला विरोध दर्शविण्यासाठी अकोला जिल्हा सराफा असोसिएशनच्या वतीने सोमवारी धिंग्रा चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शहर आणि जिल्हय़ातील सराफा व्यावसायिकांनी विरोध दर्शविणारी फलके हाती धरून, सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. भर चौकात करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे अर्धा तास शहर वाहतूक विस्कळीत झाली होती.

Web Title: Stop the way of bullion professionals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.