खरब ढोरे येथील अवैध दारूविक्री बंद करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:20 IST2021-09-27T04:20:52+5:302021-09-27T04:20:52+5:30
मुर्तिजापूर : तालुक्यातील खरब ढोरे येथे गावठी व देशी दारुची अवैधरित्या विक्री सुरू असून, अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर ...

खरब ढोरे येथील अवैध दारूविक्री बंद करा!
मुर्तिजापूर : तालुक्यातील खरब ढोरे येथे गावठी व देशी दारुची अवैधरित्या विक्री सुरू असून, अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. हे अवैध धंदे तत्काळ बंद करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी ओबीसी सेल महिला जिल्हाध्यक्षा सुषमा कावरे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन राऊत यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनानुसार, मूर्तिजापूर येथून जवळच येत असलेल्या तालुक्यातील खरब ढोरे येथे मागील काही वर्षांपासून सर्रासपणे गावठी व देशी दारुची अवैधरित्या विक्री सुरू आहे. या अवैध दारू विक्रीचा परिणाम गावातील तरुण पिढी, गोरगरीब शेतकरी व शेतमजूर यांच्यावर होऊन ते व्यसनाधीन झाले आहेत. त्यामुळे गावातील महिलांचे संसार उघड्यावर आले आहेत. मुला-बाळांचे यामध्ये शैक्षणिकदृष्ट्या नुकसान होत आहे. तरी पोलीस अधिकाऱ्यांनी तत्काळ गंभीर दखल घेऊन खरब ढोरे येथील अवैधरित्या सुरू असलेल्या गावठी व देशी दारुची विक्री बंद करावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या वतीने महिला जिल्हाध्यक्षा सुषमा कावरे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन राऊत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल महिला जिल्हाध्यक्षा तसेच गावकऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. निवेदनावर ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण बोळे, रंजना नरेश सदार, सुर्वणा प्रशांत सपकाळ, विष्णू लोडम, वर्षा कावरे, विशाल शिरभाते यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.