दगडाने ठेचून युवकाची हत्या

By Admin | Updated: April 8, 2017 01:46 IST2017-04-08T01:46:52+5:302017-04-08T01:46:52+5:30

विझोरा : बार्शीटाकळी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या येळवण येथे एका २३ वर्षीय युवकाची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना ६ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता उघडकीस आली.

The stone crushed teenager killed | दगडाने ठेचून युवकाची हत्या

दगडाने ठेचून युवकाची हत्या

विझोरा : बार्शीटाकळी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या येळवण येथे एका २३ वर्षीय युवकाची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना ६ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी बार्शीटाकळी पोलिसांनी ७ एप्रिल रोजी एका महिलेसह युवकाला ताब्यात घेतले आहे.
येळवण येथील दिलीप अरु ण तायडे हा युवक ६ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता शौचास जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला. एक ते दीड तासापर्यंत तो परत न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला.
त्याच्या भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता तो प्रतिसाद देत नव्हता. काही वेळाने रात्री ९ वाजता तो रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळला. घटनेची माहिती पोलीस पाटील दुर्गा उईके यांनी बार्शीटाकळी पोलिसांना दिली. बार्शीटाकळीचे ठाणेदार सतीश पाटील यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी कल्पना भराडे यांनी घटनास्थळाला भेट दिली.
पोलिसांनी सोबत आणलेल्या श्वानाने संशयित आरोपीपर्यंत पोहोचवले. त्यानुसार बार्शीटाकळी पोलिसांनी एका महिलेसह युवकाला ताब्यात घेतले आहे. दिलीपचे व संशयित आरोपीचे गावातीलच एका विवाहितेशी अनैतिक संबंध होते. त्यातूनच ही हत्या झाल्याचा संशय आहे.

श्वान हिराने शोधला खुनी!
दिलीप तायडे युवकाचा दगडाने ठेचून हत्या केल्यानंतर अज्ञात आरोपी फरार झाला. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर त्याचा शोध सुरू केला; परंतु आरोपी सापडत नसल्याने, पोलिसांनी श्वान हिराला पाचारण केले. घटनास्थळावर आरोपी व मृतकाच्या चपला पडून होत्या. या चपलांचा हिराला गंध दिल्यावर हिराने गावातील एका घरात प्रवेश केला. घरामध्ये रक्ताचे डाग दिसून आले, तसेच रक्ताने माखलेले टी शर्टसुद्धा मिळाले. घरामध्ये उपस्थित आरोपीच्या अंगावर श्वान गेल्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. यावेळी आरोपीने त्याचे नाव गिरधर चक्रधर तायडे (२१) असे सांगितले आणि हत्येची कबुली दिली. आरोपी शोधून काढल्याबद्दल श्वान पथकाचे पीएसआय सुजित डांगरे, श्वान हस्तक राजीव चौधरी, गोपाल चव्हाण यांना पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी एक हजार रुपये रिवॉर्ड दिला.

दिलीपचे ठरले होते लग्न
दिलीप तायडे याचे लग्न अवघ्या १५ दिवसांवर येऊन ठेपले होते. विशेष म्हणजे, दिलीपची हत्या होण्यापूर्वीच तो लग्नाचा बस्ता घेऊन आला होता. २३ एप्रिल रोजी त्याचा विवाह मूर्तिजापूर तालुक्यातील सांगवा मेळ येथील मुलीशी होणार होता.

अनैतिक संबंधातून हत्या
दिलीप व गिरधर तायडे चुलतभाऊ होते. गावातीलच एका महिलेसोबत दोन्ही युवकांचे अनैतिक संबंध होते. यातून दोघांमध्येही नेहमीच खटके उडायचे. या वादातूनच गिरधरने त्याच्या मार्गात अडसर ठरत असलेल्या दिलीपचा काटा काढल्याची चर्चा गावामध्ये आहे.

Web Title: The stone crushed teenager killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.