तलावात विहीर खोदून पाणी चोरले!
By Admin | Updated: March 17, 2016 02:28 IST2016-03-17T02:28:11+5:302016-03-17T02:28:11+5:30
मेहकर तालुक्यातील घटना; तीन शेतक-यांविरुद्ध गुन्हा दाखल.

तलावात विहीर खोदून पाणी चोरले!
मेहकर (जि. बुलडाणा): तालुक्यातील घाटबोरी येथील तीन शेतकर्यांनी कनका शिवारातील तलावात विहीर खोदून त्यातील पाणी चोरल्याचा प्रकार १६ मार्च रोजी उघडकीस आला. शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून पाण्याची चोरी करणार्या तीन शेतकर्यांविरुद्ध डोणगाव पोलीस स्टेशनला विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अत्यल्प पावसामुळे यावर्षी सर्वत्र दुष्काळ पसरला आहे. त्यामुळे सिंचन तलावातून अवैध पाण्याचा उपसा करण्यावर प्रशासनाने बंदी घातली आहे, तसेच सिंचन तलावाच्या २00 मीटर परिसरात विहीर खोदकाम करण्यास शासनाची मनाई आहे; परंतु तालुक्यातील घाटबोरी येथील पुंजाजी जानकीराम पाखरे, राजेश पुंजाजी पाखरे व संदीप पुंजाजी पाखरे या तीन शेतकर्यांनी संगणमत करून कनका शिवारातील सिंचन तलाव घाटबोरी येथे २00 मीटर परिसरात विहीर खोदकाम करण्यास मनाई असतानाही तलावात विहीर खोदून सिमेंटने सदर विहीर बांधून घेतली. ४ जानेवापासून विहिरीत मोटरपंपद्वारे पाण्याची चोरी करून स्वत: च्या शेतातील कांदा पिकास पाणी दिले. त्यामुळे तलावाची खराबी करून नुकसान केले. यासंदर्भात जि.प.सिंचन उपविभागीय अधिकारी सच्चिदानंद नीळकंठ पाटील यांनी १६ मार्च रोजी डोणगाव पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी पुंजाजी जानकीराम पाखरे, राजेश पुंजाजी पाखरे व संदीप पुंजाजी पाखरे या तीन शेतकर्यांविरुद्ध कलम १८८, ३४, ३७९, ४२७, ४३0 भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.