स्त्री रुग्णालयात स्टोव्हचा भडका, सात महिला भाजल्या
By Admin | Updated: December 23, 2015 02:45 IST2015-12-23T02:45:42+5:302015-12-23T02:45:42+5:30
पाणी गरम करीत असताना घडली घटना, दोन महिला गंभीर जखमी.

स्त्री रुग्णालयात स्टोव्हचा भडका, सात महिला भाजल्या
अकोला: जिल्हा स्त्री रुग्णालयाजवळील कॅन्टीनमध्ये पाणी गरम करीत असताना अचानक स्टोव्हचा भडका उडाला. यात सात महिला भाजल्या. ही घटना मंगळवारी सकाळी ७.३0 वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. याप्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी कॅन्टीनमालकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. स्त्री रुग्णालयाजवळील एका कॅन्टीनमध्ये पाणी गरम करण्यासाठी एक महिला आली. कॅन्टीनमधील स्टोव्हवर पाणी गरम करीत असताना अचानक स्टोव्हने पेट घेतला आणि भडका उडाला. या भडक्यामुळे स्टोव्हजवळच उभ्या असलेल्या गोदावरी सुभाष बारडेकर (४0 रा. लोणी काळे ता. मेहकर), सत्यभामा देवराव सोनोने(४0 रा. आकोली जहागिर), उषा रामकृष्ण इंगळे (रा. सुटाळा, ता. खामगाव), शोभा मधुकर शेळके (४0 रा. खामखेड, ता. पातूर), रुक्मा रामदास गोपनारायण(६0, रा. मांगूळ, ता. बाश्रीटाकळी), रेखा विष्णू अत्तरकर(२३ रा. पातूर) आणि मेहरुन्निसा माजिद खान(६१ रा. सोनटक्के प्लॉट, जुने शहर) या महिला भाजल्या गेल्या. यातील दोन महिला २५ टक्के भाजल्याने, त्यांना सर्वोपचार रुग्णालयातील जळीत वॉर्डमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. स्त्री रुग्णालयाजवळ रमाकांत हरिशंकर मिश्रा याची कॅन्टीन आहे. कॅन्टीनमधील गणेश रमेश सहारे हा रुग्णालयात येणार्या रुग्णांच्या नातेवाइकांना गरम पाणी उपलब्ध करून देतो. मंगळवारी सहारे हा स्टोव्हवर पाणी गरम करीत होता. गरम पाणी घेण्यासाठी या ठिकाणी सात ते आठ महिला उभ्या होत्या. अचानक स्टोव्हचा मोठा भडका उडाल्याने, उभ्या असलेल्या महिलाही भाजल्या गेल्या. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून जखमी महिलांना सर्वोपचार रुग्णालयामध्ये दाखल केले. चंदाबाई गिर्हे (३२ रा. खामखेड) यांच्या तक्रारीवरून रामदासपेठ पोलिसांनी कॅन्टीनमालक रमाकांत मिश्रा व त्याचा साथीदार गणेश सहारे यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३३७, ३३८, २८५, २८६ अन्वये गुन्हा दाखल केला.