मॅक्सिन प्रकरणात गुन्हे दाखल करण्यास न्यायालयाची स्थगिती
By Admin | Updated: August 3, 2016 01:46 IST2016-08-03T01:46:25+5:302016-08-03T01:46:25+5:30
१८ लाखांच्या देयकांच्या बदल्यात तत्कालीन आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, उपायुक्त डॉ. उत्कर्ष गुटे यांनी २0 टक्के कमिशनची मागणी केल्याचा आरोप.

मॅक्सिन प्रकरणात गुन्हे दाखल करण्यास न्यायालयाची स्थगिती
अकोला: मॅक्सिन कॉर्पोरेशन कंपनीच्या याचिकेवर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या प्रथम श्रेणी न्यायालयाच्या आदेशाला मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने स्थगिती दिली. न्यायालयाच्या आदेशामुळे संबंधित अधिकार्यांना दिलासा मिळाला आहे. महापालिकेच्या अग्निशमन विभागातील वाहनांच्या देखभाल-दुरुस्तीचा कंत्राट प्रशासनाने मुनव्वर शेख अब्दुल सत्तार यांच्या मॅक्सिन कॉर्पोरेशन कंपनीला दिला होता. मुनव्वर शेख यांनी पालिका प्रशासनाकडे सादर केलेल्या १८ लाखांच्या देयकांच्या बदल्यात तत्कालीन आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, उपायुक्त डॉ. उत्कर्ष गुटे यांनी २0 टक्के कमिशनची मागणी केल्याचा आरोप तक्रारकर्त्या शेख यांनी केला होता. तसेच सहायक आयुक्त राजेंद्र घनबहाद्दूर, अग्निशमन अधिकारी रमेश ठाकरे व कर्मचारी मनीष कथले यांच्या माध्यमातून करारनाम्याच्या दस्तावेजमध्ये खोडतोड केल्याची तक्रार पोलिसांत नोंदवली. तसेच स्थानिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. प्रथम श्रेणी न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी यशदीप मेश्राम यांनी तत्कालीन आयुक्तांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून जिल्हा व सत्र न्यायालयात प्रथम श्रेणी न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देण्यात आले. याविषयी जिल्हा व सत्र न्यायाधीश जी.जी.भालचंद्र यांच्यासमोर सुनावणी झाली असता त्यांनी प्रथम श्रेणी न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली. मनपाची बाजू अँड. सुभाष काटे, अँड. तळोकार यांनी मांडली.