शिक्षकांच्या मागण्यांसाठी राज्यव्यापी शाळा बंदची हाक!

By Admin | Updated: January 13, 2015 00:58 IST2015-01-13T00:58:59+5:302015-01-13T00:58:59+5:30

दहावी, बारावीच्या परीक्षांवरही बहिष्कार, २ फेब्रुवारीपासून बेमुदत बंद.

Statewide school closure call for teachers' demands! | शिक्षकांच्या मागण्यांसाठी राज्यव्यापी शाळा बंदची हाक!

शिक्षकांच्या मागण्यांसाठी राज्यव्यापी शाळा बंदची हाक!

सचिन राऊत/अकोला
शिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांसाठी या संघटनांनी २ फेब्रुवारीपासून बेमुदत शाळा बंदची हाक दिली आहे. राज्यातील २२ हजार शाळांनी राज्यव्यापी बंद पुकारण्याचा इशारा दिला असून, दहावी व बारावीच्या परीक्षांवरही बहिष्कार टाकण्याचा निर्णय या संघटनांनी घेतला आहे.
शिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या विविध मागण्या गत अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. २0१३ मधील अध्यादेश रद्द करून चिपळूणकर समितीच्या शिफारशीनूसार शिक्षकेतर कर्मचार्‍यांची पदं शाळांमध्ये भरण्यात यावी, २00४ पासून बंद झालेले वेतनेतर अनुदान सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे देण्यात यावे, शालेय पोषण आहार संदर्भात सरकारने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे कारवाई करण्यात यावी, या योजनेसाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वीत करण्यात यावी, निकषात असणार्‍या नवीन तुकड्यांना १00 टक्के अनुदान देण्यात यावे, यासोबतच सर्व शालेय कर्मचार्‍यांचे वेतन नियमीत करण्याची मागणीही या आंदोलनाव्दारे करण्यात येणार आहे. या मागण्यांसंदर्भात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात कोणताही ठोस निर्णय न झाल्याने राज्यातील शिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
राज्य शिक्षकेतर कर्मचारी महामंडळ, माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक महासंघ, शिक्षण संस्थाचालक संघटनांनी ६ जानेवारी रोजी असहकार आंदोलन केले होते. आता १३ जानेवारी रोजी राज्यातील शाळा एक दिवसासाठी बंद ठेवण्यात येणार असून, त्यानंतरही तोडगा न काढल्यास राज्यातील २२ हजार शाळा २ फे ब्रुवारीपासून बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे दहावी व बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही राज्य शिक्षकेतर कर्मचारी महामंडळ, माध्यमिक व उच्च माध्यमिक संघटना, शिक्षण संस्थाचालक संघटना व मुख्याध्यापक संघटनेव्दारे देण्यात आला आहे.
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यामध्ये यश आले नाही. मागण्या प्रलंबितच असल्याने १३ जानेवारी रोजी राज्यव्यापी शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतरही मागण्या पूर्ण न झाल्यास २ फेब्रुवारीपासून बेमुदत राज्यव्यापी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे राज्य शिक्षकेतर कर्मचारी महामंडळाचे सरचिटणीस शिवाजी खांडेकर यांनी लोकमतशी बोलताना सांगीतले.
 

Web Title: Statewide school closure call for teachers' demands!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.