शेतकरीपुत्रांसाठी प्रत्येक जिल्ह्यात होणार अत्याधुनिक अभ्यासिका
By Admin | Updated: March 20, 2015 01:03 IST2015-03-20T01:03:39+5:302015-03-20T01:03:39+5:30
अकोल्याच्या पालकमंत्र्यांची संकल्पना; राज्यभर राबविणार, अर्थसंकल्पात तरतूद.

शेतकरीपुत्रांसाठी प्रत्येक जिल्ह्यात होणार अत्याधुनिक अभ्यासिका
अकोला : ग्रामीण भागातून शहरात शिक्षण घेण्यासाठी येणार्या विद्यार्थ्यांंना अभ्यासासाठी सोयीचे स्थळ असावे, या उद्देशाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अभ्यासिका सुरू करण्याचा प्रस्ताव नगरविकास राज्यमंत्री तथा अकोला-वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी मांडला होता. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यापुढे मांडलेल्या या प्रस्तावानुसार राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये अभ्यासिका सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. ग्रामीण भागातून शहरात उच्चशिक्षणासाठी मोठय़ा प्रमाणावर विद्यार्थी येतात. यात प्रामुख्याने शेतकरीपुत्रांचा समावेश असतो. गरीब कुटुंबातून शिक्षणासाठी शहरात आलेल्या या विद्यार्थ्यांंना अभ्यास करताना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. अभ्यासासाठी सोयीचे स्थान नसल्याने अनेक वेळा हे विद्यार्थी ग्रंथालयांचा आधार घेतात. येथेही त्यांना हवी तशी सुविधा आणि एकांत मिळत नसल्याने शहरातील विद्यार्थ्यांंच्या स्पर्धेत हे विद्यार्थी गुणात्मकरीत्या माघारतात. अभ्यासासाठी सोयीच्या आणि सर्व सुविधांनी युक्त अशा अभ्यासिका असाव्यात, जेथे बसून एकाग्रतेने या विद्यार्थ्यांंना अभ्यास करता यावा, असा प्रस्ताव डॉ. रणजित पाटील यांनी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यापुढे अमरावती येथे झालेल्या बैठकीच्या निमित्ताने मांडला होता. विभागीय नियोजन समितीच्या बैठकीमध्ये २९ जानेवारी रोजी त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात अभ्यासिकांसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करण्याची मागणी केली होती. विशेषत: ग्रामीण भागाशी संबंध येणार्या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी या अभ्यासिका प्राधान्याने येणार्या आर्थिक वर्षात निर्माण करण्यात याव्यात, असा प्रस्ताव त्यांनी मांडला आहे. डॉ. पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या अभ्यासिकेची योजना आता संपूर्ण राज्यभर राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. अर्थसंकल्पात त्यासाठी खास निधीची तरतूद करण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यभर जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी या अभ्यासिका सुरू करण्यात येणार आहेत.