महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रावर सौर ऊर्जा प्रकल्पाचा होणार श्री गणेशा!
By आशीष गावंडे | Updated: December 31, 2023 19:35 IST2023-12-31T19:34:43+5:302023-12-31T19:35:02+5:30
मनपाच्या कोट्यवधी रुपयांच्या विद्युत देयकाची होणार बचत

महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रावर सौर ऊर्जा प्रकल्पाचा होणार श्री गणेशा!
आशिष गावंडे /
अकोला: ‘अमृत अभियान’ अंतर्गत महान येथील जलशुध्दीकरण केंद्रात उभारण्यात आलेल्या साैर उर्जा प्रकल्पाचा लवकरच श्रीगणेशा होणार आहे. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात हा ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार आहे. यामुळे विद्युत देयकापोटी महावितरणकडे कोट्यवधी रुपये अदा कराव्या लागणाऱ्या मनपा प्रशासनाला मोठा दिलासा मिळणार आहे.
केंद्र व राज्य शासनाने मंजूर केलेल्या ‘अमृत अभियान’ अंतर्गत शहरातील पाणीपुरवठा वितरण प्रणाली निकाली काढण्यासाठी ११० कोटी रुपये तसेच भूमिगत गटार योजनेसाठी ८७ कोटी रुपये निधी प्राप्त झाला होता. या दोन्ही योजना निकाली काढण्यात आल्या असून महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावर तसेच शिलाेडा येथे भूमिगत गटार योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या सिवरेज ट्रीटमेंट प्लांटच्या जागेवर सौर ऊर्जा प्रकल्प मंजूर करण्यात आला होता. याकरिता सहा कोटी ५२ लाखांचा प्रस्ताव मंजूर झाला होता. महान येथील जलशुद्धीकरण केंद्र तसेच शिलाेडा येथील ‘एसटीपी’मध्ये कार्यान्वित केल्या जाणाऱ्या सौर ऊर्जेपासून १४०० किलोवॅट वीज निर्मिती होणार आहे. दरम्यान, महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावर उभारण्यात आलेल्या ऊर्जा प्रकल्पाचे काम नेट मीटरिंगमुळे खोळंबल्याचे समाेर आले होते. सदर काम पूर्ण झाल्याची माहिती आहे.
जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होणार कार्यान्वीत
सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्याची जबाबदारी राज्य शासनाने महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरणाकडे सोपवली होती. या प्राधिकरणाने भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीची नियुक्ती केली. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात प्रकल्प सुरू होणार असल्याची माहिती आहे.