‘त्या’ ब्रिटिशकालीन पुलाच्या कामास प्रारंभ
By Admin | Updated: May 12, 2014 00:04 IST2014-05-11T23:56:46+5:302014-05-12T00:04:39+5:30
पुलाने शंभरी ओलांडली

‘त्या’ ब्रिटिशकालीन पुलाच्या कामास प्रारंभ
मेहकर : येथील पैनगंगा नदीवरील ब्रिटिश कालीन पुलाने शंभरी ओलांडली असुन त्या पुलाच्या कामास नव्याने प्रारंभ झाला आहे. शहराची सर्वात मोठी समस्या खोळंबलेली रहदारी. नागपूर-औरंगाबाद हायवेवर असलेल्या मेहकर शहरात एकदा वाहन अडकले की, बाहेर निघणे मुश्कील. शहरात असलेले अरुंद रस्ते व रस्त्यावर उभ्या करण्यात येणार्या अस्ताव्यस्त वाहनामुळे रहदारीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. अरुंद रत्यावरील खड्डेही वाहतुक खोळंबण्यास भर टाकत आहेत. शहरातुन जाणार्या मुख्य अरुंद रस्त्यावरच खाजगी वाहने अस्ताव्यस्त उभी राहतात. शहराला लागुनच पैनगंगा नदी आहे. त्यावरुन ब्रिटिश कालीन पुल असून त्यापुलानेही शंभरी ओलांडली आहे. मेहकर शहरातून जाणार्या प्रत्येक वाहनाला या धोकादायक पुलाचा सामना कराव लागतो. या पुलावरून एकावेळी एकच वाहन जावू शकते. त्यामुळे जड वाहनाचा प्रवेश झाला तर पुलापासून संपुर्ण शहरातच तासन-तास वाहतूक खोळंबताना दिसून येते. औरंगाबाद नागपूर जाणार्या सर्व वाहनांना याच जिर्ण झालेल्या पुलावरून जावे लागते. खोळंबणार्या वाहतूकीमुळे शहरात दररोज अपघाताच्या घटना घडत आहेत. या ब्रिटिश कालीन पुलाच्या कामाला कित्येक दिवसांनतर सुरूवात झाली असल्याने येथुन जाणार्या वाहनधारकांनी सुटकेचा श्वास घेतला. आता पुलाचे काम होत असल्याने वाहतूक पोलिसांचीही थोड्या बहुत प्रमाणात काळजी मिटणार आहे. या पुलाचे काम पुर्ण झाल्यानंतर मेहकर शहरातील वाहतुकीची मोठी समस्या दुर होणार आहे.