स्थायी समितीचे गठण नाहीच!
By Admin | Updated: April 8, 2015 01:48 IST2015-04-08T01:48:52+5:302015-04-08T01:48:52+5:30
लखोटा उघडल्यानंतर सभा केली स्थगित; प्रकृती अस्वास्थ्याची सबब पुढे करीत महापौरांचा निर्णय.

स्थायी समितीचे गठण नाहीच!
अकोला : दीड वर्षांपासून रखडलेले स्थायी समितीचे पुनर्गठण होऊन शहर विकासाची कामे मार्गी लागतील, ही अपेक्षा मंगळवारीही फोल ठरली. महापालिकेच्या मुख्य सभागृहात पार पडलेल्या विशेष सभेत संभाव्य स्थायी समिती सदस्यांची नावे असलेला लखोटा उघडल्यानंतर अचानक प्रकृती अस्वास्थ्याची सबब पुढे करीत ही सभा स्थगित करण्याचा निर्णय महापौर उज्ज्वला देशमुख यांनी घेतला. महापौरांच्या अचंबित करणार्या निर्णयामुळे राजकीय क्षेत्रात मोठा भूकंप आला असून, यानिमित्ताने भाजपमधील अंतर्गत कलह शिगेला पोहोचल्याचे समोर आले. महापालिकेच्या १६ सदस्यीय स्थायी समितीचे पुनर्गठण करण्यासाठी सदस्य निवडीसाठी ७ एप्रिल रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. स्थायी समिती सदस्य निवडीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश व त्यानंतर विभागीय आयुक्तांनी निश्चित केलेल्या गटनेत्याच्या निवडीनंतर ही अग्निपरीक्षा सत्ताधारी भाजप-शिवसेना युती सहज पार पाडेल, अशी अकोलेकरांना अपेक्षा होती. ती पूर्णत: फोल ठरल्याचे चित्र सभागृहात दिसून आले. १६ सदस्यांची निवड करण्यासाठी दोन विशेष सभांचे आयोजन करण्यात आले होते.