रस्त्यांवर साचले पाणी; अकोलेकरांची तारांबळ
By Admin | Updated: January 2, 2015 01:34 IST2015-01-02T01:34:47+5:302015-01-02T01:34:47+5:30
खड्डय़ांमुळे नागरिकांच्या समस्येत भर.

रस्त्यांवर साचले पाणी; अकोलेकरांची तारांबळ
अकोला : नववर्षाच्या पूर्वसंध्येपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले असून, अकोलेकरांची चांगलीच तारांबळ उडत आहे. खड्डय़ांमुळे मुख्य रस्त्यांची अक्षरश: चाळण झाल्याने नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र गुरुवारी पहावयास मिळाले. अतवृष्टीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाल्याने दीड वर्षांपूर्वी शासनाकडून रस्ते दुरुस्तीसाठी १५ कोटींचे अनुदान प्राप्त झाले होते. लोकसभा व त्यानंतर पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याची सबब पुढे करीत प्रशासनाने १५ कोटींच्या निविदा काढल्या नाहीत. सत्तापक्षासोबत समन्वय व नियोजनाच्या अभावामुळे अद्यापपर्यंत रस्ते दुरुस्तीला प्रारंभ होऊ शकला नाही. शहरातील प्रमुख रस्त्यांवर खड्डय़ांचे जाळे निर्माण झाल्यामुळे अकोलेकरांना विविध आजारांनी त्रस्त करून सोडले आहे. खड्डय़ांमुळे मानेचे दुखणे, कंबरदुखी, स्पाँडिलायटीस, स्लीप डिस्कसारख्या आजारांची देण अकोलेकरांना लाभली असून, प्रशासन मात्र नियोजन करण्यात दंग आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येपासून शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. नाल्यांमधील घाण पाणी रस्त्यावर साचले असून, खड्डय़ांमधून वाट काढताना अकोलेकरांची चांगलीच दमछाक होत असल्याचे चित्र पहावयास मिळाले.