धान्य साठय़ाला गोदाम क्षमतेचा अडसर
By Admin | Updated: October 23, 2016 02:06 IST2016-10-23T02:06:00+5:302016-10-23T02:06:00+5:30
हजारो क्विंटलचे वाटप झाले असून धान्य साठवायला जागाच उपलब्ध नाही!

धान्य साठय़ाला गोदाम क्षमतेचा अडसर
अकोला, दि. २२- सार्वजनिक वितरण प्रणालीतून लाभार्थींना नियमित धान्य वाटपासाठी लागणारी साठवणुकीची क्षमता जिल्ह्यातील सातपैकी सहा तालुक्यांच्या गोदामात नाही. त्यातच दरमहा धान्य वाटपाचे वेळापत्रकही पाळले जात नसल्याने ही समस्या गंभीर होत आहे. आता जिल्ह्यात आणखी ४८ हजारांपेक्षाही अधिक शिधापत्रिकाधारक कुटुंबांना धान्य वाटपासाठी पात्र केले जाणार आहे. त्यांच्या धान्य साठय़ाचीही मोठी अडचण निर्माण होणार आहे.
राज्यात अन्न सुरक्षा कायदा लागू झाला. त्यावेळी लाभार्थींची संख्याही निश्चित झाली होती. त्यामध्ये ग्रामीण भागा तील एकूण शिधापत्रिकांच्या ७६ टक्के, तर शहरी भागात ४५ टक्के लाभार्थींना अन्नधान्यासाठी पात्र ठरविण्यात आले. उर्वरित लाभार्थी एका झटक्यातच वंचित झाले.
अन्न सुरक्षा कायद्याच्या अंमलबजावणीमुळे फेब्रुवारी २0१४ पासून वंचित असलेल्या शिधापत्रिकाधारकांपैकी निवड करून त्यांना धान्य दिले जाणार आहे. त्यासाठी ग्रामीण भागात ४१,३२५, तर शहरी भागातून ७२0९ लाभार्थींना पात्र ठरविले जाणार आहे. ही निवड प्रक्रिया पुरवठा विभागाकडून लवकरच सुरू केली जाणार आहे.
मात्र, त्याचवेळी जिल्ह्यात सद्यस्थितीत असलेल्या शिधापत्रिकाधारकांना दरमहा वाटप करण्याइतके धान्य साठवणूक क्षमताच नाही. त्यामुळे महिन्याच्या काही दिवसांपर्यंत धान्य आणणे त्यानंतर वाटप करणे, हाच कार्यक्रम सुरू आहे. आता आणखी शिधापत्रिकाधारकांना धान्य वाटप सुरू झाल्यानंतर दहा ते बारा हजार मे.टन धान्य दरमहा द्यावे लागणार आहे. प्रत्येक तालुक्यात सरासरी दीड ते दोन हजार मे.टन धान्य अतिरिक्त वाटप होणार आहे. ते धान्य कोठे साठवावे, ही समस्या पुरवठा विभागाकडे नव्याने निर्माण होणार आहे.
एकाचवेळी साठा आणि वाटपाची घाई
जिल्ह्यात सद्यस्थितीत चालू महिन्याचे धान्य वाटप करण्यासाठी त्याच महिन्यात उचल केली जाते. प्रत्यक्षात गोदामा त कोणत्याही वेळी दोन महिने वाटपाचा साठा उपलब्ध असावयास हवा. मात्र, जिल्ह्यात कोठेच ती परिस्थिती नाही. पातूर तालुक्यात दरमहा ८ ते ९ हजार मे.टन धान्य वाटप होते. तेथे केवळ तीन हजार मे.टन क्षमतेचे गोदाम आहे. बाश्रीटाकळी तालुक्यात सात ते आठ हजार मे.टन धान्य वाटपासाठी चार ते पाच हजार मे.टन क्षमतेचे गोदाम आहेत. बाळापुरात आठ हजार मे.टन नियतनासाठी ५ हजार मे.टन क्षमतेचा गोदाम आहे. अकोट आणि तेल्हारा तालुक्यातही हीच परिस्थिती आहे. मूर्तिजापूर तालुक्यासाठी गोदामाची क्षमता समाधानकारक आहे.