श्रीधर स्वामी महाराज अनंतात विलीन
By Admin | Updated: May 16, 2017 01:29 IST2017-05-16T01:29:16+5:302017-05-16T01:29:16+5:30
पंचगव्हाण येथे हजारो भक्तांच्या उपस्थितीत साश्रू नयनांनी दिला निरोप

श्रीधर स्वामी महाराज अनंतात विलीन
लोकमत न्यूज नेटवर्क
तेल्हारा / पंचगव्हाण (जि. अकोला) : तालुक्यातील पंचगव्हाण येथील विद्यावाचस्पती श्रीधर स्वामी महाराज यांचे १४ मेच्या रात्री ११.४५ वाजता वयाच्या ८६ व्या वर्षी अकोला येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले होते. त्यांच्या पार्थिवास १५ मे रोजी सायंकाळी ६ वाजता त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव अनिल अग्रवाल यांनी मुखाग्नी दिला. यावेळी हजारो भक्तांनी साश्रू नयनांनी त्यांना निरोप दिला.
विद्यावाचस्पती श्रीधर स्वामी महाराज यांचा जन्म तेल्हारा तालुक्यातील पंचगव्हाण येथे ८ फेब्रुवारी १९३१ रोजी झाला होता. किसनलाल अग्रवाल व ताराबाई अग्रवाल हे त्यांचे आई-वडील होते. त्यांचे बालपण पंचगव्हाणमध्ये गेले. अकोल्यातील सीताबाई आर्टस कॉलेजमधून बी.ए. व नागपूरच्या हिस्लॉप कॉलेजमधून इंग्रजी विषयात एम.ए. केले. त्यानंतर बनारस विद्यापीठात संस्कृत विषयात एम.ए.केले. त्यांना चारही वेद मुखोद्गत होते. त्यांनी देश-विदेशात धर्मप्रचार व प्रसार करीत धर्मजागृतीचे कार्य केले.
अमेरिकेत युनोद्वारे वर्ष २००० मध्ये जगात शांतता नांदावी याकरिता आयोजित जागतिक परिषदेत त्यांनी देशाचे नेतृत्व केले होते. वयोमानाने त्यांची प्रकृती ठीक राहत नव्हती. १४ मेच्या रात्री ११.४५ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांची अंत्ययात्रा १५ मे रोजी दुपारी ४ वाजता पंचगव्हाण येथील त्यांच्या निवासस्थानापासून टाळ, मृदंगाच्या गजरात व ‘जय जय रामकृष्ण हरि’च्या नामघोषात निघाली. त्यांच्या शेतात हजारो भक्तांच्या उपस्थितीत त्यांच्यावर दाहसंस्कार करण्यात आले. पंचक्रोशीतील भाविकासंह मान्यवर उपस्थित होते.