अकोल्यात रोवली गेली श्रीगुरुदेव सेवा मंडळाची मुहूर्तमेढ!
By Admin | Updated: April 30, 2015 01:52 IST2015-04-30T01:52:36+5:302015-04-30T01:52:36+5:30
१९४३ मधील चतुर्मासात अकोल्यात होता राष्ट्रसंतांचा मुक्काम.

अकोल्यात रोवली गेली श्रीगुरुदेव सेवा मंडळाची मुहूर्तमेढ!
नितीन गव्हाळे /अकोला : अकोलेकर आणि तुकडोजी महाराज यांचे जुने नाते. त्यांच्यासोबत घालविलेले काही दिवस, काही क्षणांच्या आठवणींना उजाळा देणारे अनेकजण अकोला जिल्हय़ात आहेत. त्याचे कारणही तसेच आहे, चार दिवस नव्हेतर तब्बल चार महिने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अकोल्यातील राजराजेश्वर मंदिरात वास्तव्य केले. त्यांच्या सहवासातच राष्ट्रसंतांच्या शिष्यांनी अकोल्यातच श्री गुरुदेव सेवा मंडळाची मुहूर्तमेढ रोवली. राष्ट्र, आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना अकोल्यात झाली. याचे कोणालाही नवल वाटेल, पण ही गोष्ट खरी आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मगाव यावली (जि.अमरावती), माणिकदेव बंडूजी इंगळे हे त्यांचे नाव. त्यांची जन्मभूमी यावली असली तरी त्यांची कर्मभूमी ही विदर्भ होती. खंजिरी भजनातून त्यांनी विदर्भातील सर्वच जिल्हय़ात भ्रमंती करून समाजात प्रबोधनाची ज्योत प्रज्वलित केली. अकोल्याशी तर त्यांचा विशेष ऋणानुबंध होता. १९४३ मधील चतरुमासात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अकोल्यात आले होते. याठिकाणी त्यांना व त्यांच्या विचारांना मानणारा मोठा वर्ग होता, तो आजही आहे. अकोल्यातील राजराजेश्वर मंदिरामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एक शिबिर घेतले. तब्बल चार महिने त्यांनी मंदिरात वास्तव्य करून खंजिरीच्या माध्यमातून अकोलेकरांचे प्रबोधन केले. अकोल्यात त्यांचे स्व. ओंकारराव मुंडगावकर, रामदास काळे, किसनलाल गोयनका, पांडुरंग भिरड, ह.भ.प आमले महाराज, सुधाताई जवंजाळ, अँड. रामसिंग राजपूत हे पट्टशिष्य होत. स्व. ओंकारराव मुंडगावकरांकडे त्यांचे नेहमीच येणे-जाणे होत असे. आपल्या शिष्यांना घेऊन ते अकोला जिल्हय़ातील प्रत्येक गावामध्ये जाऊन ग्राम जागृती करीत. समाजप्रबोधन करीत. अकोल्यातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या चार महिन्यांच्या वास्तव्यामध्ये श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या स्थापनेचा विचार समोर आला.
महाराजांनीही त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिल्याने श्री गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना झाली. अभिमानाची बाब ही की, राष्ट्रसंतांच्या विचारांनी प्रेरित सेवा मंडळाची सुरुवातच अकोल्यातून झाली. त्यामुळेच अकोला जिल्हय़ातील प्रत्येक घरा तील व्यक्ती राष्ट्रसंतांच्या विचारांशी, ग्रामगीतेशी समरस झाली.
*चार महिन्यांच्या वास्तव्यात जय हिंद चौकात व्हायचे भजन
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अकोल्यात चार महिने वास्तव्य केले. कधी राजराजेश्वर मंदिर तर कधी सावतराम मिल परिसरात त्यांचे वास्तव्य असायचे. यादरम्यान त्यांचे जय हिंद चौकामध्ये भजन व्हायचे. हजारो अकोलेकरांची त्यांचे भजन ऐकण्यासाठी गर्दी जमायची.