खमंग झुणक्याला महागाईची फोडणी!
By Admin | Updated: April 12, 2016 02:07 IST2016-04-12T01:53:07+5:302016-04-12T02:07:53+5:30
भजे, आलूवड्याचेही भाव वधारले; हरभ-याचे उत्पादन घटल्याचा परिणाम.

खमंग झुणक्याला महागाईची फोडणी!
अकोला: भाकरीबरोबर चवीने खाल्ल्या जाणारा झुणकाही महागाईच्या फोडणीमुळे गोरगरिबांच्या आवाक्यात राहिलेला नाही. हरभर्याचे उत्पादन घटल्याने हरभर्याच्या डाळीसह बेसनाचे दर मोठय़ा प्रमाणावर वाढले आहेत. मागील काही वर्षांत हरभरा बेसनाच्या भावाने आठवडाभरात उच्चांक गाठला आहे. त्यामुळे खमंग झुणक्यासोबतच चवदार भजे, आलुवड्यांनासुद्धा महागाईची झळ बसू लागली आहे. गत दोन वर्षांपासून रब्बी हंगामात हरभरा पिकाच्या लागवडीच्या काळात पावसाने दडी मारली होती. त्याचा फटका हरभरा पिकाला बसला आणि हरभर्याचे उत्पादन घटले. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात बाजारात हरभरा दाखल होतो. यंदा हंगामाच्या सुरुवातीपासूनच मागणीच्या तुलनेत हरभर्याची आवक कमी झाली. परिणामी हरभर्याचे भाव वाढले. सोमवारी घाऊक बाजारात हरभर्याला क्विंटलमागे ४३00 ते ४७७५ रुपये भाव मिळाला. अमरावती विभागात दरवर्षी हरभरा पिकाचे उत्पादन समाधारक होते; परंतु गत दोन वर्षांपासून अकोला, अमरावती, वाशिम, बुलडाणा आणि यवतमाळ जिल्हय़ात हरभरा पिकाचे उत्पादन कमी झाले. त्यामुळे बाजारातील आवक तुलनेने कमी झाली. त्याचा परिणाम भाववाढीवर होत आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभर्याला प्रतिक्विंटल ४६७५ रुपये सरासरी भाव मिळत आहे. हरभरा महागल्याने डाळ आणि बेसनावरही विपरीत परिणाम झाला आहे. शनिवारी हरभरा डाळीचे भाव क्लिंटलमागे ६४ ते ७0 रुपयांपर्यंत पोहोचले, तर आठवडाभरात बेसनाच्या भावाने ५0 किलोमागे ३४४0 ते ३८७0 रुपयांपर्यंत मजल मारली. किराणा बाजारामध्ये बेसनाचे भाव प्रतिकिलोमागे ९२ रूपये आहे.