‘जीएमसी’तच होतोय साथीच्या आजारांचा प्रसार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 01:57 PM2019-09-16T13:57:25+5:302019-09-16T13:57:32+5:30

सर्वोपचार रुग्णालयातील अस्वच्छता साथीच्या आजारांसाठी कारणीभूत ठरत आहे.

spreading communicable diseases in GMC hospital Akola | ‘जीएमसी’तच होतोय साथीच्या आजारांचा प्रसार!

‘जीएमसी’तच होतोय साथीच्या आजारांचा प्रसार!

googlenewsNext

अकोला : सध्या साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले असून, सर्वोपचार रुग्णालयातील अस्वच्छता साथीच्या आजारांसाठी कारणीभूत ठरत आहे. हा प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास पडत असला, तरी त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. सर्वोपचार रुग्णालयाची पाहणी केली असता ठिकठिकाणी जलवाहिनी फुटलेली आहे. जलवाहिनीतील सांडलेल्या पाण्यामुळे येथेच डबके साचत आहे. येथून जवळच बालरुग्ण विभाग असून, त्या ठिकाणीही डबके व झुडुपे आढळून आली. हा सर्व प्रकार डासांच्या उत्पत्तीसाठी कारणीभूत आहे. त्यात आणखी भर म्हणजे याच परिसरात मोठ्या प्रमाणात उघड्यावर खाद्यपदार्थ टाकण्यात येतात. त्यामुळे डासांसोबतच माशांचाही प्रादुर्भाव वाढला आहे. त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होत असल्याचे दिसून येते.

क्षयरुग्णांसाठी धोकादायक
क्षयरुग्ण वॉर्डाच्या बाजूलाच सर्वोपचार रुग्णालयातील कचरा टाकण्यात येतो. यामध्ये इतर जैववैद्यकीय कचऱ्यासोबतच ओल्या नारळाचा कचरा टाकण्यात येतो. गत दोन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे येथील कचरा ओला झाल्याने दुर्गंधी पसरली आहे. शिवाय, डासांच्या उत्पत्तीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून, क्षयरुग्णांसाठी हा प्रकार धोकादायक ठरत आहे.

वॉर्डातही डासांचा प्रादुर्भाव
बाहेरील अस्वच्छतेमुळे सर्वोपचार रुग्णालयातील वॉर्डांमध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. अशा परिस्थितीत उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णांचे आरोग्य अधिक धोक्यात येत आहे; परंतु याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

 

Web Title: spreading communicable diseases in GMC hospital Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.