अंडरपास रोडच्या कामाला गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:19 IST2021-02-05T06:19:44+5:302021-02-05T06:19:44+5:30
सिमेंट रस्त्यावर पडले खड्डे अकोला: शहरातील विविध भागात नव्याने सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे शहराच्या सौंदर्यीकरणात ...

अंडरपास रोडच्या कामाला गती
सिमेंट रस्त्यावर पडले खड्डे
अकोला: शहरातील विविध भागात नव्याने सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडली असून अकोलेकरांचीही खड्ड्यांपासून सुटका झाली होती. मात्र, नव्याने निर्मित रस्त्यांवरही खड्डे पडू लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. शहरातील गौरक्षण रोड, सिव्हिल लाईन रोड, नेकलेस रोड यासह टॉवर चौक ते रतनलाल प्लॉट चौक मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याचे दिसून येत आहे. या रस्त्याची दुरूस्ती करुनही खड्डे कायम आहेत.
बर्ड फ्लूची धास्ती, अंड्यांची मागणी घटली
अकोला: जिल्ह्यातील विविध भागात अनेक पक्षी मृतावस्थेत सापडत असल्याने जिल्ह्यात बर्ड फ्लूची भीती पसरली आहे. मृत पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून अद्याप त्याचे अहवाल प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे अनेकांमध्ये बर्ड फ्लूची धास्ती पसरली आहे. त्याचा फटका अंडे विक्रेत्यांना बसल्याचे दिसून येत आहे. अंड्यांची मागणी घटली असून त्यांच्या किमतीही कमी झाल्याचे दिसून येत आहे.
बसस्थानक परिसरात अस्वच्छता
अकोला: शहरातील दोन्ही बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढली आहे. त्याचसोबतच येथील अस्वच्छताही वाढली आहे. येथील कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन होत नसल्याने अनेकदा हा कचरा बसस्थानक परिसरातच जाळण्यात येत असल्याचे चित्र दिसून येते. कचरा जाळल्यानंतर निघणारा धूर प्रवाशांसाठी हानिकारक ठरत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. बसस्थानक परिसरातील कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करून बसस्थानक परिसरात स्वच्छता मोहीम राबविणे आवश्यक आहे.
स्टेशन रोड देतोय अपघातास निमंत्रण
अकोला: अग्रसेन चौक ते रेल्वे स्टेशन या मार्गावर दोन्ही बाजूने डांबरीकरण करण्यात आले, मात्र डांबरीकरणाचे पॅचिंग योग्य पद्धतीने करण्यात आले नाही. रस्त्याच्या एका बाजूला पॅचिंग तर दुसऱ्या बाजूने रस्ता तसाच सोडण्यात आल्याने या मार्गावर दुचाकी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूने उर्वरित पॅचिंगचे कार्य पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.