हिवरखेडमधील हॉटेलवर विशेष पथकाचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2017 01:20 IST2017-04-08T01:20:05+5:302017-04-08T01:20:05+5:30

हॉटेल मालक ताब्यात, ४.५० लाखांच्या मुद्देमालासह दारू जप्त

Special squad raids in Hiverkhed hotel | हिवरखेडमधील हॉटेलवर विशेष पथकाचा छापा

हिवरखेडमधील हॉटेलवर विशेष पथकाचा छापा

अकोला : अकोट ते हिवरखेड रोडवर असलेल्या राही हॉटेलवर जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या विशेष पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक हर्षराज अळसपुरे यांनी शुक्रवारी दुपारी छापा टाकला. या हॉटेलमधून अवैधरीत्या विक्री करण्यात येत असलेल्या देशी-विदेशी दारूसह तब्बल ४ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हॉटेलचे मालक अकोला येथील रहिवासी सचिन उमाळे याच्यासह पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अकोट ते हिवरखेड रोडवरील अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हॉटेल राहीमधून देशी आणि विदेशी दारूची अवैधरीत्या विक्री करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या विशेष पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक हर्षराज अळसपुरे यांना मिळाली. त्यांनी पथकासह या हॉटेलवर छापा टाकला. हॉटेलची झाडाझडती घेतल्यानंतर देशी आणि विदेशी दारूच्या साठ्यासह ४ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. यासोबतच हॉटेलचा मालक अकोला येथील रहिवासी सचिन रामकृष्ण उमाळे आणि त्याचे साथीदार मुकुंद रामराव वानखडे, रा. तुरखेड अमरावती, जगदीश प्यारेलाल जयस्वाल रा. खापरखेडा अमरावती, प्रमोद प्रभुदास ठाकरे रा. कारला अमरावती आणि अशोक साहेबराव गहले रा. देऊळगाव अकोट या पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक मीणा यांच्या पथकाचे प्रमुख असलेले सहायक पोलीस निरीक्षक अळसपुरे यांची आजपर्यंतची देशी आणि विदेशी दारूवरील ही सर्वात मोठी कारवाई असल्याची माहिती आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या विशेष पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक हर्षराज अळसपुरे यांनी त्यांच्या पथकासह केली.

पोलिसांच्या पार्टीसाठी होता दारूचा साठा
हॉटेल राही येथे अकोट ग्रामीण आणि अकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या पोलिसांच्या पार्टीसाठीच हा दारूचा साठा ठेवल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे; मात्र विशेष पथकाने पार्टी सुरू होण्याच्या आधीच गोपनीय माहितीवरून ही कारवाई केल्याने पोलिसांच्या पार्टीवर विरजन पडले.
छापा टाकल्यानंतर रेफ्रिजेरेटरभर दारूच्या बॉटल आढळून आल्या. २५ ते ३० पोलिसांची या ठिकाणी पार्टी आयोजित होती आणि त्यासाठीच हा दारूचा साठा ठेवल्याची माहिती हॉटेलमधीलच एकाने घटनास्थळावर दिली.

Web Title: Special squad raids in Hiverkhed hotel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.