अकोल्यातील अनधिकृत फलक काढण्याची विशेष मोहीम
By Admin | Updated: January 6, 2015 01:29 IST2015-01-06T01:29:51+5:302015-01-06T01:29:51+5:30
साहाय्यक पोलीस अधीक्षक मुंढे यांची माहिती.

अकोल्यातील अनधिकृत फलक काढण्याची विशेष मोहीम
अकोला: शहरात अनधिकृतपणे फलक, बॅनर, झेंडे लावले जातात. या फलकांवर मंदिर, मशिदींसोबतच देवी-देवता, थोरमहापुरुषांची छायाचित्रे असतात. त्यामुळे बर्याचदा या फलकांची विटंबना होते. आकोट फैल, शिवणी, आकोट स्टँड परिसरात फलकांची विटंबना केल्याचे प्रकार घडले आहेत. हे प्रकार थांबविण्यासाठी आणि शहराचे विद्रूपीकरण रोखण्यासाठी महापालिकेच्या मदतीने शहरातील अनधिकृतपणे लावलेले फलक, बॅनर, झेंडे, स्वागतकमानी काढण्यासाठी पोलीस विभागाच्यावतीने मंगळवारपासून विशेष मोहीम हाती घेणार असल्याची माहिती साहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली. शहरामध्ये राजकीय पक्ष, सामाजिक, धार्मिक संघटना, संस्था तसेच व्यापारी अनधिकृतरीत्या फलक, बॅनर, झेंडे लावतात. मात्र त्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी कुणी स्वीकारायला पुढे येत नाही. विटंबना झाली, कुण्या अज्ञात व्यक्तीने फलक, बॅनर फाडले तर जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. त्यासाठी पोलीस विभाग व महापालिका प्रशासन संयुक्तरीत्या शहरातील अनधिकृत फलक काढण्याची मोहीम मंगळवारपासून सुरू करणार आहे. सार्वजनिक ठिकाण, इमारत, घरावर कुणी अनधिकृत फलक, बॅनर लावले असेल तर त्यांनी ते काढून टाकावेत. अन्यथा पोलीस कायदेशीर कारवाई करतील आणि गुन्हे दाखल करतील, असा इशाराही मुंढे यांनी दिला.