सोयाबीनचे अनुदान अन् तुरीचे अडकले चुकारे!
By Admin | Updated: May 13, 2017 05:15 IST2017-05-13T05:03:18+5:302017-05-13T05:15:52+5:30
अकोला जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल

सोयाबीनचे अनुदान अन् तुरीचे अडकले चुकारे!
संतोष येलकर
अकोला : सोयाबीनचे अनुदान आणि ह्यनाफेडह्णद्वारे तूर खरेदीत गत ४ एप्रिलपासून खरेदी करण्यात आलेल्या तुरीचे चुकारे अद्याप शेतकऱ्यांना मिळाले नाही. सोयाबीनचे अनुदान आणि विकलेल्या तुरीचे चुकारे अडकल्याने जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.
गत पावसाळ्यात परतीचा जोरदार पाऊस बरसल्याने सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सोयाबीन विकलेल्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २०० रुपयेप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनामार्फत गत २० जानेवारी रोजी घेण्यात आला. त्यानुसार सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्यासाठी जिल्ह्यातील सोयाबीन विकलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडून मागविण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या याद्यांची तालुका व जिल्हास्तरीय समितीकडून छाननी करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यात २२ हजार ९२७ शेतकरी सोयाबीन अनुदानासाठी पात्र ठरविण्यात आले. अनुदानासाठी पात्र ठरलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या याद्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत २३ मार्च रोजी राज्याच्या पणन संचालकांकडे पाठविण्यात आल्या असून, अनुदान वाटप करण्यासाठी ७ कोटी ५६ लाख ३९ हजार २७४ रुपये निधीची मागणीही करण्यात आली. दीड महिना उलटून गेला; मात्र अनुदानाचा निधी शासनामार्फत अद्याप प्राप्त झाला नाही. त्यामुळे सोयाबीनचे अनुदान केव्हा मिळणार, याबाबतची प्रतीक्षा जिल्ह्यातील अनुदानास पात्र शेतकऱ्यांकडून केली जात आहे, तसेच ह्यनाफेडह्णद्वारे तूर खरेदी गत २२ एप्रिलपासून बंद करण्यात आली असली, तरी नाफेडच्या खरेदीत ४ ते २२ एप्रिलपर्यंत खरेदी करण्यात आलेल्या तुरीचे चुकारे जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना अद्याप मिळाले नाही. त्यामुळे विकलेल्या तुरीची रक्कम केव्हा मिळणार, याबाबत प्रतीक्षा करण्याची वेळ तूर उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे. पावसाळा तोंडावर आला; मात्र सोयाबीन अनुदानाचा लाभ अद्याप मिळाला नाही आणि विकलेल्या तुरीचे चुकारे मिळाले नसल्याच्या स्थितीत शेतकरी हवालदिल झाला आहे.
सोयाबीन अनुदानाच्या प्रतीक्षेत असे आहेत शेतकरी!
सोयाबीन अनुदानासाठी जिल्ह्यातील २२ हजार ९२७ शेतकरी पात्र ठरविण्यात आले असून, अनुदानाची रक्कम केव्हा मिळणार, याबाबतची प्रतीक्षा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे. त्यामध्ये अकोला तालुक्यातील १२ हजार ७५९, अकोट तालुक्यातील २ हजार ७१५, बाळापूर तालुक्यातील २४३, बार्शीटाकळी तालुक्यातील ७१, पातूर तालुक्यातील २८७, तेल्हारा तालुक्यातील १ हजार ३३० व मूर्तिजापूर तालुक्यातील ५ हजार ५२२ सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश आहे.
सोयाबीन अनुदानासाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या याद्या पणन संचालक कार्यालयाकडे सादर करण्यात आल्या असून, अनुदानाची मागणी करण्यात आली आहे. निधी उपलब्ध होताच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यात येणार आहे.
-जी.जी. मावळे, जिल्हा उपनिबंधक.
नाफेडद्वारे तूर खरेदीत गत ४ ते २२ एप्रिलपर्यंत खरेदी करण्यात आलेल्या तुरीचे चुकारे अद्याप शेतकऱ्यांना मिळाले नाही. पावसाळा तोंडावर आला असून, शेतकऱ्यांना पेरणीची तयारी करावी लागत आहे. त्यामुळे विकलेल्या तुरीची रक्कम शेतकऱ्यांना तातडीने मिळाली पाहिजे.
- शिरीष धोत्रे,
सभापती, अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती.