परिपक्वतेपूर्वीच वाळले सोयाबीन!
By Admin | Updated: October 3, 2014 01:32 IST2014-10-03T01:32:40+5:302014-10-03T01:32:40+5:30
विदर्भातील शेतकर्यांवर संकटांची मालिका कायम

परिपक्वतेपूर्वीच वाळले सोयाबीन!
अकोला : विदर्भात कपाशीला मोठ्या प्रमाणात खो दिलेल्या सोयाबीनचे पीक परिपक्वतेपूर्वीच वाळल्याने शेतकर्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
सोयाबीन पीक सध्या परिपक्वतेच्या अवस्थेत आहे. सोयाबीनला यावेळीच पाण्याची नितांत गरज असते; परंतु यावर्षी पावसाचे आगमनच उशिरा झाले आणि बर्याच दिवसांपासून त्याने दडी मारली आहे. त्यातच तापमान प्रचंड वाढल्याने सोयाबीनचे पीक करपले आहे. चालू खरीप हंगामात सतत संकटाच्या मालिकेचा सामना करणार्या विदर्भातील शेतकर्यांनी आता या संकटापुढे हात टेकले आहेत.
विदर्भात यावर्षी पावसाला दोन महिने विलंब झाल्याने, सर्वच खरीप पिकांची पेरणी उशिरा झाली. सोयाबीनची पेरणी तर पार ऑगस्ट महिन्यापर्यंत लांबली. तसे हे पीक ऑक्टोबरमध्ये काढणीला येते; परंतु पेरणीला उशीर झाल्याने या पिकाचा काढणीचा हंगाम एक महिना पुढे गेला आहे. आता पावसाळा संपल्याने या पिकाला पाणी मिळणे कठीण झाले आहे आणि वापशा (ऑक्टोबर हिट) मुळे तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे विदर्भातील १८ लाख हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन करपायला सुरुवात झाली आहे. शेंगा भरल्या नसल्याने अगोदरच शेतकरी चिंतेत असताना, आता पीक जळत असल्याचे पाहून शेतकर्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
गतवर्षी अतवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले होते. शेतकर्यांना सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा जाणवू नये, यासाठी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज)ने आंध्र प्रदेशात उन्हाळी सोयाबीनची पेरणी केली होती. राज्याच्या कृषी विभागाने राज्यातही तो प्रयोग केला खरा; परंतु तो फसल्यामुळे शेतकर्यांना यावर्षी पेरणीसाठी चांगले बियाणे मिळाले नाही. त्यामुळे हजारो हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीनच्या पेरण्या उलटल्या. परिणामी शेतकर्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली. पेरणी केल्यानंतर सतत वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकर्यांना कीटकनाशकांची अतिरिक्त फवारणी करावी लागली. त्यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सा पडला. सोयाबीनचे पीक साथ देईल, या आशेवर तो स्वप्न रंगवत होता; परंतु पावसाअभावी सोयाबीन काळवंडले असून, हजारो हेक्टरवरील हे पीक जळायला लागले आहे. परतीच्या पावसानेही दगा दिल्याने अस्मानी संकटापुढे शेतकरी अक्षरश: हतबल झाला आहे.