पेरण्या सुरू; उगवणीची मात्र धाकधूक
By Admin | Updated: July 21, 2014 00:19 IST2014-07-21T00:19:04+5:302014-07-21T00:19:04+5:30
आकोट तालुक्यातील शेतकरी संभ्रमावस्थेत

पेरण्या सुरू; उगवणीची मात्र धाकधूक
आकोट : तालुक्यातील कोरडवाहू शेतकर्यांनी पेरण्या करण्यास सुरुवात केली असून, सर्व पिकांची वेळ निघून गेल्याने निसर्गावर विश्वास ठेवून सोयाबीनचा पेरा करण्यात येत आहे. मात्र, सोयाबीन उगवणीबाबत बहुतांश शेतकरी साशंक असल्याने त्यांच्या धाकधूक वाढलेली आहे.
यावर्षी पावसाचे येणे लांबल्याने पेरण्याही पुढे ढकलल्या गेल्या. मात्र ज्यांच्याकडे पाण्याची सोय होती ते कपाशी आणि सोयाबीन दोन्हीचा पेरा करून मोकळे झाले; परंतु नैसर्गिक पावसावर मदार असलेल्या कोरडवाहू पेरण्या मात्र पावसाअभावी खोळंबलेल्याच राहिल्या. यादरम्यान उडीद, ज्वारी आदी पिकांची वेळ निघून गेली आणि पावसाने काहीशी मेहेरबानी करण्यास सुरुवात केली; परंतु दमदार पावसाची सुरुवात झालीच नाही. त्यातही पाऊस सावत्रपणे वागला. कुठे दोन-तीनदा हलकासा तर कुठे बर्यापैकी चार-पाचदा बरसला. एवढय़ानेच हर्षभरीत झालेल्या कोरडवाहू शेतकर्यांनी पेरण्यांची लगबग सुरू केली. सर्व पिकांची वेळ निघून गेल्याने अनेकांनी सोयाबीनलाच पसंती दिली; परंतु सोयाबीनच्या उगवणशक्तीबाबत यावेळी खुद्द महाबीजनेच कानावर हात ठेवल्याने शेतकरी धास्तावलेलाच होता. पावसाच्या उदासीनतेमुळे सोयाबीनच्या उगवणशक्तीबाबत साशंकता असूनही शेतकर्यांनी यावेळी ह्यछातीला मातीह्ण लावण्याचे धाडस केले आहे. तालुक्याच्या उत्तरेकडील हरितपट्टय़ात धाडसाचे काम नाही. तिथे पाण्याची मुबलकता असल्याने पिके हमखास जोमदार राहतील; परंतु तालुक्याच्या दक्षिणेकडील खारपाणपट्टय़ाचा मोठा वांधा आहे. नैसर्गिक पाण्याविना हा पट्टा जगूच शकत नाही. अशा स्थितीत देवरीफाटा परिसरात चार-पाचदा बर्यापैकी पाऊस झाल्याने शेतकर्यांनी पेरा केला, करीत आहेत. मात्र, चोहोट्टा परिसरात मोठे धाकधुकीचे वातावरण आहे. पावसाच्या अनिश्चिततेमुळे पेरावे की न पेरावे, अशी शेतकर्यांची संभ्रमावस्था आहे. त्यातच काही ठिकाणी पेरलेल्या सोयाबीनचे अंकूर अद्याप भूगर्भातून बाहेरच न आल्याने शेतकर्यांची धास्ती अधिकच वाढली आहे.
काही बागायत शेतातही सोयाबीन उगवलेच नसल्याच्या वार्ता कानी पडत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गात अनामिक भीती निर्माण झालेली आहे. हे सोयाबीन न उगवण्यामागे दोन महत्त्वाची कारणे सांगितली जात आहेत. त्यातील एक म्हणजे खरोखरच पेरलेल्या बियाण्याची उगवणशक्ती नष्ट झालेली असणे आणि दुसरे म्हणजे सोयाबीनच्या उगवणीसाठी हवी असलेली ओल शेतात नसणे.