व-हाडात आतापर्यंत एक लाख हेक्टरवर पिकांचे नुकसान!
By Admin | Updated: April 15, 2015 02:00 IST2015-04-14T01:50:41+5:302015-04-15T02:00:52+5:30
शनिवारच्या पावसामुळे अकोला जिल्हय़ात १६00 हेक्टरवरील फळ, पिकांना फटका.

व-हाडात आतापर्यंत एक लाख हेक्टरवर पिकांचे नुकसान!
अकोला : जानेवारी महिन्यापासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून, पश्चिम विदर्भातील पाच जिल्हय़ातील एक लाख हेक्टरच्यावर गहू, हरभरा या रब्बी पिकांसह भाजीपाला, फळपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल कृषी विभागाला प्राप्त झाला आहे. पण, एप्रिल महिन्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे नुकसानाचे आकडे बदलत असून, पुन्हा सर्वेक्षण सुरू आहे. पश्चिम विदर्भातील अकोला, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ आणि अमरावती याच पाच जिल्हय़ात गेल्या पावसाळ्य़ात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने सर्वच खरीप पिकांचे उत्पादन घटले आहे. रब्बी पिकांवर आस लावून बसलेल्या शेतकर्यांना या पावसाने पीक ऐन काढणीच्यावेळी फटका दिल्याने रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. तेव्हापासून अवकाळी पाऊस सुरू असून, शेतकर्यांना उसंत देत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. या अवकाळी पावसाला १४ डिसेंबरपासून सुरुवात झाली, ते जानेवारी १५ पर्यंत हा पाऊस अधूनमधून सुरू होता. सोसाट्याचा वारा, गारासंह आलेल्या या पावसामुळे पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्हय़ातील ८,८७0 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. ९ ते १५ फेब्रुवारीपर्यंत आलेल्या या अवकाळी पावसाचा ९,९३७ हेक्टर क्षेत्रावरील सर्वच प्रकारच्या पिकांना प्रचंड फटका बसला, पण हा पाऊस उसंतच देत नसल्याने पुन्हा २८ फेब्रुवारी ते २ मार्चपर्यंत पडलेल्या पावसामुळे सर्वाधिक ४५ हजार ३९0 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे अतोनात नुकसान झाले. ८ ते १२ मार्चपर्यंत हा पाऊस सतत सुरू असल्याने या पाच जिल्हय़ातील १६,६४६ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली आहेत. यावर्षीच्या पावसाळ्य़ात कमी पाऊस झाल्याने उत्पादनावर प्रचंड परिणाम झाला, तर रब्बी पिकावर आस लावून बसलेल्या शेतकर्यांना यावर्षी अवकाळी पावसाने दगा दिला आहे. एप्रिल महिन्यात पाच ते सहा दिवसांपासून पाऊस सुरू आहे. शनिवारी व रविवारी प्रचंड गारांसह पाऊस कोसळला. या पावसामुळे अकोला जिल्हय़ातील १६00 हेक्टरवरील फळे, भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.