सामाजिक संवेदना झाल्या बोथट
By Admin | Updated: July 5, 2014 01:00 IST2014-07-05T00:23:07+5:302014-07-05T01:00:38+5:30
बलात्काराच्या घटनेनंतर निषेधाचा सूर मंद, कुठेही प्रतिक्रिया नाही

सामाजिक संवेदना झाल्या बोथट
मलकापूर : मलकापूरच्या नावाला काळीमा फासणारी घटना परवा घडली. कुमारिकेवर वासनांध तरुणांनी सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी त्यांची कामगिरी चोख बजावली. मात्र राजकीय, सामाजिक संघटनांकडून एक दोन अपवाद वगळता जिल्हाभरात साधा निषेधही नोंदविण्यात आला नाही. त्यामुळे येथील सामाजिक संवेदना बोथट झाली की अशा प्रकारांना मुक सर्मथन? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यातील महत्वाच्या तालुक्यांपैकी एक असे मलकापूर. जातीय दंगलीकरिता एकेकाळी कुप्रसिध्द त्यामुळेच शासन दरबारी अतिसंवेदनशिल स्थळ म्हणून त्याची नोंद होती, अर्थात मागील दोन दशकात तशी परिस्थिती राहिली नाही, पण वाद भांडण, घोडी कुरघोडी सुरुच असतात. इतर ठिकाणसारख्याच छोट्यामोठय़ा घटना इथेही घडतात मात्र एखाद्या तरुणीवर सामूहिक बलात्काराची घडलेली घटना येथील समाजीक स्वास्थ धोक्यात आल्याचे लक्षण आहे.
परवा रात्री एक कुमारीका याच जिल्ह्यातील मात्र सद्याचे वास्तव्य मुंबईत तिच्या मावशासह मलकापुरात येते अन तिच्यावर सामूहिक बलात्कार वासनांध तरुण करतात ही तर दूष्कृत्याची परिसिमाच आहे. दिल्लीतल्या बलात्काराने मलकापूरकर प्रभावित होतात. वेळप्रसंगी आरोपींचे फाशीसाठी कँडलमार्चच्या माध्यमातून रस्त्यावर येतात. वृत्तपत्रात छापूनही आणण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे अनेकदा घडले आहे.
इथे मात्र परिस्थिती पुरती वेगळीच निदर्शनास येते. पोलिसांनी पोलिस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या नेतृत्वात आरोपींना अटक करण्यापासून तर गुन्ह्याचा तपास व आरोपींवर निर्धारीत केलेल्या कलमा बघता केलेली कारवाई चोख अशीच आहे. मात्र राजकारण व समाजकारणात काम करणार्या काँग्रेस कमेटी व मनसे वगळता कोणीही निषेधाचा सुर लावला नाही. काल आरोपीना न्यायालयात नेले होते तेथे बलात्कारीत कुमारीकेला बघण्यासाठी जिवाचा आटापिटा अनेकांनी केला यामधून आपली मानसीकता कुठे जात आहे याचे प्रत्यंतर आले मात्र एवढाच आटापिटा या बलात्काराच्या घटनेबाबत विरोध नोंदविण्यासाठी झाला असता तर बलात्कारी वृत्तींवर धाक बसला असता.
मलकापुरात कुमारिकेवरील बलात्काराच्या प्रकरणात अपवाद वगळता साधा निषेधही कुणी नोंदविला नाही. दिल्लीसारखीच मलकापुरातही लेकबाळ सुरक्षीत नाही हे या घटनेवरुन स्पष्ट होते. विशेष म्हणजे ३३ टक्के आरक्षणाकरिता महिलांचे विविध सेल पुढे येतात इथे मात्र गप्प कशासाठी? चार-दोन वाईट प्रवृत्तीमुळे इमानदार ऑटोचालकांवर प्रश्नचिन्ह नको परंतु अँटो चालकांनीही अशा घटनेचा निषेध नोंदवू नये का?
पोलिसांचा पाठपुरावा व न्यायालय त्या नराधमांना शासन करेलच यात शंका नाही. मात्र बोथट झालेल्या स्थानिक समाजभावनेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.