स्मिता तळवळकरांनी दिला होता कलावंतांना नाट्यक्षेत्रातील यशस्वितेचा मंत्र!
By Admin | Updated: August 7, 2014 22:49 IST2014-08-07T21:48:46+5:302014-08-07T22:49:15+5:30
स्मिता तळवळकर यांचे अकोल्यातील नाट्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या कलावंतांशीही नाते जुळले होते.

स्मिता तळवळकरांनी दिला होता कलावंतांना नाट्यक्षेत्रातील यशस्वितेचा मंत्र!
अकोला: अभिनेत्री स्मिता तळवळकर यांच्या निधनाने संपूर्ण नाट्यसृष्टीच हळहळली आहे. स्मिता तळवळकर यांचे अकोल्यातील नाट्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या कलावंतांशीही नाते जुळले होते. १९९३ साली झालेल्या कला व साहित्य महोत्सवात स्मिता तळवळकर अकोल्यात तीन दिवस वास्तव्यास होत्या. यादरम्यान त्यांचे मार्गदर्शन कलावंतांना लाभले. यावेळी त्यांनी अनेक कलावंतांना नाट्यसृष्टीत यशस्वितेचा मंत्र दिला होता.
अभिनेत्री स्मिता तळवळकर यांच्या निधनाची बातमी कळताच अकोल्यातील नाट्यकलावंतांनी दु:ख व्यक्त केले. त्यांच्या निधनाच्या वृत्तामुळे त्यांचे अकोल्याशी जुळलेल्या नात्यांच्या आठवणी ताज्या झाल्या. येथील प्रमिलाताई ओक हॉलमध्ये १0 ते १२ सप्टेंबर १९९३ मध्ये अकोला जिल्हा कला व साहित्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून स्मिता तळवळकर आल्या होत्या. यावेळी त्या तीन दिवस मुक्कामी होत्या. तत्कालीन मंत्री अरुण दिवेकर यांचे त्यांच्याशी कौटुंबिक संबंध होते. त्यांच्या आग्रहाखातर त्या कार्यक्रमाला आल्या होत्या. या कार्यक्रमाला अभिनेते मोहन जोशीही होते. तीन दिवस अकोल्यात मुक्कामी असल्यामुळे या काळात अनेक कलावंतांचा स्मिताताईंशी संबंध आला. अनेकांना त्यांनी नाट्यसृष्टीतील नवनवीन घडामोडींबाबत अवगत केले. प्रमिलाताई ओक हॉलचे सचिव मनमोहन तापडिया यांनी सांगितले की, स्मिताताई तीन दिवस अकोल्यात होत्या. त्यावेळी त्यांच्याशी संपर्क झाला. कुठलेही मानधन न घेता त्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. निर्माता, दिग्दर्शक आणि कलावंत म्हणून त्यांची उणीव मराठी नाट्यसृष्टी व चित्रपटसृष्टीला नेहमीच भासेल. अशोक ढेरे यांनी सांगितले की, स्मिताताई मनमिळाऊ व सुस्वभावी होत्या.