मोकाट जनावरांचा रस्त्यावर ठिय्या
By Admin | Updated: August 12, 2014 21:49 IST2014-08-12T21:46:28+5:302014-08-12T21:49:58+5:30
अपघातास निमंत्रण; महापालिकेचे दुर्लक्ष

मोकाट जनावरांचा रस्त्यावर ठिय्या
अकोला : शहरातील रस्त्यांवर जागोजागी मोकाट गुरांनी उच्छाद मांडला असून, यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. दिवसा व रात्रीसुद्धा प्रमुख मार्गावर जनावरांनी ठिय्या मांडल्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. ही जनावरे ताब्यात घेणे गरजेचे असताना, मनपाचा कोंडवाडा विभाग कागदी घोडे नाचविण्यात मश्गूल असल्याचे चित्र आहे. शहरात ठिकठिकाणी रस्त्यांवर मोकाट गुरे व कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. मोकाट जनावरांना पक डण्याची जबाबदारी मनपाच्या कोंडवाडा विभागावर आहे. कोंडवाडा विभागाचे कर्मचारी, वाहने आणि कोंडवाड्यांची देखभाल व त्यामध्ये नसलेल्या गुरांसाठीचा चारा, यापोटी खर्ची पडणार्या लाखो रुपयांचा बोजा नाहक अकोलेकरांवर पडत आहे. मोकाट जनावरांमुळे ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी, किरकोळ अपघात व वाहनधारकांमधील शाब्दिक बाचाबाची, असे काहीसे चित्र पाहावयास मिळत आहे. या प्रकाराला अकोलेकर वैतागले असून, महापालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर नाराजी व्यक्त करीत आहेत.
** मोकाट गुरे-श्वान पकडण्यासाठी कोंडवाडा विभागाला सुसज्ज वाहन उपलब्ध करून देण्यात आले. या वाहनाच्या दुरुस्तीसाठी २ लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च करण्यात आला. शहरातील मुख्य मार्गांवरील गुरांचे चित्र लक्षात घेता कोंडवाडा विभागाचे अधिकारी-कर्मचारी नेमके करतात तरी काय, असा सवाल उपस्थित होत आहे. अकोलेकरांच्या खिशातून वसूल केल्या जाणारे लाखो रुपये या विभागावर खर्च होत असल्याचा सूर जनमानसात उमटत आहे.