कृषीपूरक व्यवसायासाठी कौशल्य विकास कार्यक्रम
By Admin | Updated: February 28, 2015 00:43 IST2015-02-28T00:43:50+5:302015-02-28T00:43:50+5:30
शेतक-यांना प्रोत्साहन; ३३ जिल्ह्यात अंमलबजावणी.

कृषीपूरक व्यवसायासाठी कौशल्य विकास कार्यक्रम
खामगाव (बुलडाणा): शेतीची उत्पादकता वाढवून शेतकर्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी राज्यातील ३३ जिल्ह्यातील शेतकर्यांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाची अंमलबजावणीसाठी आत्मा संचालक तथा कृषी नोडल अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. कृषीपूरक व्यवसाय करण्यासाठी शेतकर्यांना यातून प्रोत्साहन मिळणार आहे.
शेतकर्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी विदर्भ विकास कार्यक्रम कृषी पुरक व्यवसायासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये २0११-१२ या वर्षात राबविण्यात आला होता. या उपक्रमाची यशस्विता पाहता, २0१२-१३ या वर्षात हा कार्यक्रम ३३ जिल्ह्यात राबविण्यात आला होता. आता हाच कार्यक्रम २0१४-१५ या वर्षातही राबविण्यात येणार आहे. यासाठी ५0 लक्ष रुपयांची तरतूद शासनाने केली आहे. कृषीपुरक व्यवसायासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यासाठी ७.५0 लक्ष रूपयांच्या निधीस शासनाची मान्यता मिळाली आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि वसंतराव नाईक राज्य कृषी व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था नागपूर यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे. संबंधित विद्यापीठाकडील कृषी विज्ञान केंद्र, स्वयंसेवी संस्थाकडील प्रशिक्षण केंद्र, कृषी चिकीत्सालये, त्याचबरोबर राष्ट्रीयकृत बँकांकडील प्रशिक्षण केंद्र व संलग्न विभागाकडील प्रशिक्षण केंद्रावर कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम सन २0१४-१५ या वर्षात राज्यातील ३३ जिल्ह्यांमध्ये राबविण्यास २४ फेब्रुवारी रोजी शासन मान्यता देण्यात आली आहे.