जागतिक जित-कुने-डो स्पर्धेत अकोल्याला सहा पदके
By Admin | Updated: March 20, 2015 00:45 IST2015-03-20T00:45:20+5:302015-03-20T00:45:20+5:30
विजेत्यांचे अकोलेकरांकडून उत्स्फूर्त स्वागत.

जागतिक जित-कुने-डो स्पर्धेत अकोल्याला सहा पदके
अकोला : थायलंडची राजधानी बँकॉक येथे कोवामार्क स्टेडिअममध्ये पार पडलेल्या ११ व्या जागतिक जित-कुने-डो मार्शल आर्ट अजिंक्यपद स्पर्धेत अकोल्याच्या खेळाडूंनी सहा पदकांची कमाई केली. यामध्ये एक सुवर्ण, चार रौप्य व एक कांस्यपदक यांचा समावेश आहे. या चिमुकल्या आंतरराष्ट्रीय मार्शल आर्ट खेळाडूंचे गुरुवार १९ मार्च रोजी शहरात आगमन झाले. विजेत्यांची रेल्वे स्थानक ते नेहरू पार्क अशी विजयी मिरवणूक काढण्यात आली. जगतिक मार्शल आर्ट स्पर्धेत ६७ देशांतील २00 पेक्षा जास्त खेळाडू सहभागी झाले होते. भारतीय संघात ८0 खेळाडूंचा १२ ते १८ मार्च दरम्यान खेळल्या गेलेल्या स्पर्धेत समावेश होता. त्यांनी या स्पर्धेत २३ पदके मिळविली. त्यापैकी सहा अकोल्याच्या वाट्याला आली. रोहिणी शंभरकर हिने सुवर्णपदक, तर सानिका नाईक, शिवाली जाधव, हृषीकेश टकोरे, कृपाल शिरभाते यांनी रौप्यपदक मिळविले. सानिका जुमळे हिने कांस्यपदक पटकाविले. स्पर्धेचे आयोजन वर्ल्ड स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ थायलंड, ऑलिम्पिक असोसिएशन, वर्ल्ड मार्शल आर्ट कौन्सिलच्या वतीने केले होते. या स्पर्धेदरम्यान अकोल्याच्या महिला प्रशिक्षक मनीषा खंडेझोड यांची भारतीय महिला प्रशिक्षकपदी निवड झाली, हे येथे उल्लेखनीय. अकोल्याचे खेळाडू प्रमुख मार्गदर्शक शिवाजी चव्हाण, प्रशिक्षक सूरज मेंगे, कुंदन लहाने, मनीषा खंडेझोड यांच्या मार्गदर्शनात सहभागी झाले होते. अकोला रेल्वे स्थानकांवर आगमन होताच अरुंधती शिरसाट, अमित दिवे, डॉ. अशोक ओळंबे, एमेरॉल्ड स्कूलच्या अल्फा तुलशान, प्राचार्य निर्मल शर्मा आदींनी खेळाडूंचे स्वागत केले. शहरातील प्रमुख मार्गावरही मिरवणुकीमध्ये क्रीडाप्रेमी नागरिकांनी चिमुकल्याचे कौतुक केले. नेहरू पार्क येथे मिरवणुकीचा समारोप झाला. या ठिकाणी महापौर उज्ज्वला देशमुख व नेहरू पार्कचे संचालक बी. एस. देशमुख यांनी खेळाडूंचे स्वागत केले.