धनादेश अनादरप्रकरणी सहा महिन्यांची शिक्षा
By Admin | Updated: April 16, 2015 01:36 IST2015-04-16T01:36:35+5:302015-04-16T01:36:35+5:30
६0 हजार रुपये मोबदला देण्याचा आदेश.

धनादेश अनादरप्रकरणी सहा महिन्यांची शिक्षा
अकोला - कीर्तीनगरमधील रहिवासी श्याम गावंडे यांना आगरकर फायनान्शियल सर्व्हिसेसच्या अनुप आगरकर यांनी दिलेला धनादेश अनादर झाल्याप्रकरणी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एस. बी. काळे यांच्या न्यायालयाने आगरकर याला सहा महिन्याची शिक्षा सुनावली. यासोबतच ६0 हजार रुपये दंड ठोठावला असून, दंड न भरल्यास आणखी तीन महिन्यांच्या साध्या कैदेची शिक्षा न्यायालयाने सुनावली. कीर्तीनगरमधील रहिवासी श्याम गावंडे यांनी रतनलाल प्लॉटमधील आगरकर फायनान्शियल सर्व्हिसेसचे संचालक अनुप आगरकर यांना मार्च २0१३ मध्ये ५0 हजार रुपये रोख दिले होते. त्यापोटी अनुप आगरकर यांनी गावंडे यांना ६0 हजार रुपयांचा धनादेश दिला. गावंडे यांनी सदर धनादेश बँकेत सादर केला असता खात्यात रक्कम नसल्याने हा धनादेश अनादरित झाला. त्यानंतर श्याम गावंडे यांनी न्यायालयात धाव घेतली. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एस. बी. काळे यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली असून, त्यांनी अनुप आगरकर याला सहा महिन्यांची शिक्षा व फिर्यादी श्याम गावंडे यांना ६0 हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. ६0 हजार रुपये न भरल्यास आणखी तीन महिन्यांच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली. फिर्यादीतर्फे अँड. डी. एस. लाहोटी यांनी तर आरोपीतर्फे ए.डी. देशपांडे यांनी कामकाज पाहिले.