विद्युत साहित्य चोरट्यास सहा महिन्यांचा सश्रम कारावास
By Admin | Updated: May 16, 2015 00:42 IST2015-05-16T00:42:26+5:302015-05-16T00:42:26+5:30
सबळ पुराव्याअभावी ४ जणांची सुटका.

विद्युत साहित्य चोरट्यास सहा महिन्यांचा सश्रम कारावास
अकोला - माना पोलीस ठाण्याच्या हद्दीतून विद्युत साहित्य चोरणार्या चोरट्यास शुक्रवारी एस.जी. देशपांडे यांच्या न्यायालयाने सहा महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच ५ हजार रुपये दंड ठोठावला असून, दंड न भरल्यास आणखी एक महिन्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. या प्रकरणातील अन्य पाच जणांची सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. चपराशीपुरा अमरावती येथील रहिवासी इफ्तेखार खान जाकीर खान याने माना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महावितरण कंपनीच्या हायटेंशनच्या कामासाठी वापरण्यात येणारे ४३ लोखंडी अँगल २५ फेब्रुवारी २0१२ च्या पूर्वी चोरी केले होते. हे अँगल चोरी केल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता होती. मात्र, सुदैवाने कुठलीही हानी झाली नाही. या प्रकरणी महावितरण कंपनीच्या तक्रारीवरून माना पोलिसांनी इफ्तेखार खान जाकीर खान याच्यासह श्यामसुंदर पांडे, जकीरुद्दीन बदरुद्दीन, अजमत खान बिस्मिल्ला खान व सै. अफसर सै. जलील या पाच जणांविरुद्ध इलेक्ट्रिसिटी अँक्टच्या कलम १३६ नुसार गुन्हा दाखल केला होता. इफ्तेखार खान जवळून १२ अँगल जप्त करून प्रकरणाचा तपास सुरू केला. या प्रकरणाची सुनावणी न्यायाधीश एस.जी. देशपांडे यांच्या न्यायालयात शुक्रवारी झाली असून, त्यांच्या न्यायालयाने इफ्तेखार खान जाकीर खानला सहा महिन्यांचा सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास आणखी एका महिन्याची शिक्षा न्यायालयाने इफ्तेखार खान जाकीर खान याला सुनावली. या प्रकरणातील इतर चार आरो पींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अँड. मो. परवेज यांनी कामकाज पाहिले.