अकोला - दगडपारवा येथील धरणामध्ये गेलेल्या जमिनीच्या नुकसान भरपाईची रक्कम हडप करणार्या बहिणीविरुद्ध रामदासपेठ पोलिसांनी गुरुवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. सदर जमिनीला ती एकमेव वारस असल्याचे शपथपत्र देऊन ही रक्कम हडपल्याचे समोर आले आहे. वाशिम जिल्ह्यातील शाहपूर खुर्द येथील रहिवासी झुगला चव्हाण यांची बार्शीटाकळी तालुक्यातील दगडपारवा शेतशिवारात ०.७८ हेक्टर शेतजमीन होती. दगडपारवा धरणाच्या निर्माणावेळी ही जमीन ताब्यात घेण्यात आली होती. या मोबदल्यात जिल्हा प्रशासनाद्वारे त्यांना रक्कमही देण्यात आली; मात्र या रकमेवर ती संतुष्ट नसल्याने मोबदल्याची रक्कम वाढविण्यासाठी झुगला चव्हाण यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या दरम्यान झुगला चव्हाण यांचे २००७ मध्ये निधन झाले. त्यानंतर झुगला यांची मुलगी सुशील मोहन राठोड (मंगरुळपीर) हिने न्यायालयात याचिकेवर एक शपथपत्र सादर केले. शपथपत्रात तिने दावा केला की, झुगला चव्हाण यांची ती एकमेव वारस असून, सदर प्रकरण पुढे सुरू ठेवण्याची विनंती केली. त्यानंतर सदर प्रकरणाची २०१३ मध्ये सुनावणी होऊन सुशीला राठोड यांच्या बाजूने न्यायालयाने निकाल दिला. सुशीला राठोड यांना शेतजमिनीचा पूर्ण मोबदलाही मिळाला. मात्र, त्यानंतर सुशीला राठोडचा सख्खा भाऊ सेवानिवृत्त कर्मचारी साहेबराव मुंगराम चव्हाण याला माहिती मिळाली की, जमिनीच्या मोबदल्याची रक्कम बहिणीने एकटीनेच हडप केली. यावर साहेबराव चव्हाण यांनी सुशीला राठोड यांनी न्यायालयात सादर केलेला प्रतिज्ञालेख आणि इतर दस्तऐवज गोळा करून तिच्याविरुद्ध १८ एप्रिल रोजी रामदासपेठ पोलिस ठाण्यात तक्रार केली. मात्र पोलिसांनी या प्रकरणी पुढील कारवाई न केल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणाची सुनावणी न्यायाधीश एस.बी. काळे यांच्या न्यायालयात झाली असून, यामध्ये सर्व दस्तऐवज तपासल्यानंतर सदर प्रकरणात सुशीला राठोड हिने तिचा सख्खा भाऊ साहेबराव चव्हाण यांची फसवणूक केल्याचे समोर आले. त्यानंतर न्यायाधीश एस. काळे यांच्या न्यायालयाने सुशीला मोहन राठोड हिच्याविरु द्ध कलम ४०९,४१५,४१७, ४१८, ४२०, ४६८, ४७१ आणि १९९ नुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर रामदासपेठ पोलिसांनी राठोड हिच्याविरुद्ध सदर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
बहिणीकडून भावाची फसवणूक
By admin | Updated: June 6, 2014 01:18 IST