'सिंधुताई' होत्या लंघापुरात दीड महिना मुक्कामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2022 06:56 PM2022-01-09T18:56:27+5:302022-01-09T18:56:45+5:30

Sindhu Tai Sapkal : एके दिवशी लंघापुरचा रस्ता विचारीत विचारीत मायी लंघापूरला पोहोचल्या.

'Sindhutai' stayed in Langhapur for a month and a half | 'सिंधुताई' होत्या लंघापुरात दीड महिना मुक्कामी

'सिंधुताई' होत्या लंघापुरात दीड महिना मुक्कामी

googlenewsNext

-संजय उमक 
मूर्तिजापूर :  तालुक्यातील लंघापूर येथे ४७ वर्षांपूर्वी सिंधुताई सपकाळ दीड महिना वास्तव्यास होत्या. त्यांची आणि येथील काही महिलांची शेगाव येथे भेट झाली भेटी दरम्यान 'सिंधुताईं' ना लंघापूर येथे येण्याचे निमंत्रण दिले. काही कालावधीतच सिंधुताई गाव विचारीत लंघापुरात दाखल झाल्या. 
         १९७४ साली लंघापुरच्या काही महीला आणि लंघापुरच्या विद्यमान सरपंच छयुताई बाबाराव पाचडे, कुसुमताई वानखडे, बेबीताई पाचडे, नानीबाई वडतकर, सुशीलाबाई माहुरे, सुभदाताई पाचडे, गिताबाई कानकिरड आणि इतर बऱ्याच महिला शेगाव दर्शनाकरीता मुकामी गेल्या. तिथे सिंधुताई सपकाळ यांच्या मधुर आवाजात भजन ऐकले आणि या महिलांनी त्यांना आमच्या लंघापुरात येण्याचे निमंत्रण दिले. तो काळ माईंचा अत्यंत संघर्षाचा होता. त्यावेळी मायींची मुलगी केवळ दोन वर्षाची होती. सासर वर्धा होते, परंतु सासरच्या मंडळींनी मायींना घराबाहेर काढले होते. दोन वेळचे जेवण सुध्दा मिळत नव्हते अशावेळी मायी कुठेही आणि कोणत्याही परीस्थीती मध्ये दिवस काढत होत्या. 
        एके दिवशी लंघापुरचा रस्ता विचारीत विचारीत मायी लंघापूरला पोहोचल्या. त्यावेळी लंधापुरचे बाबाराव पाटील पाचडे यांनी भजन मंडळ तयार केले होते. स्वतः बाबाराव पाटील हार्मोनियम वाजवित होते आणि मायीच्या भरदार आवाजातील भजन ऐकणारी मंडळी मंत्रमुग्ध होत होते.
           त्या काळात खेडोपाडी टि.व्ही. तर नव्हतेच, रेडीओ सुध्दा क्वचीत कुणाचे घरी असायचे. त्यामुळे करमणुकीचे मनोरंजनाचे एकमेव साधन पेटी तबल्याचे भजन होते. बाबाराव पाटील यांचे सोबत मायींचा माना येथील राममंदिरात आणि मंदुरा येथील सुफलदास बाबांच्या मंदिरात सुध्दा भजनाचा कार्यक्रम झाला अशा परिस्थितीत १९७४ च्या नोव्हेंबर ते डिसेंबर असे जवळपास दीड महिना मायी लंघापुर येथे वास्तव्यास होत्या. शेवटी एक दिवस माना रेल्वे स्टेशन वर रात्रीच्या पॅसेंजर गाडीवर दमणी ने मायींना स्वतः बाबाराव पाटील आणि त्यांचे दिवंगत भाऊ दिलीप यांनी पोहोचविले, आणि मायी वर्धा कडे रवाना झाल्या, त्या पुन्हा लंघापुर येथे न परतण्यासाठीच! त्यांनी बाबाराव पाटील यांचे भेटी दरम्यान पून्हा लंघापूर येथे येवुन बेसन भाकरी जेवण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु ती माईंची आणि लंघापुरकरांची ईच्छा अपूर्णच राहीली

Web Title: 'Sindhutai' stayed in Langhapur for a month and a half

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.