लाडक्या बाप्पाचे हर्षाेल्हासात आगमन..सर्वत्र गणपती बाप्पा माेरयाचा जय जयकार, ढाेल,ताशे, गुलालाची उधळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2023 13:34 IST2023-09-19T13:34:00+5:302023-09-19T13:34:11+5:30
सकाळपासूनच घरगुती गणपती आणण्यासाठी अकाेला,वाशिम व बुलढाणा जिल्ह्यातील रस्ते गर्दीने फुलून गेले.

लाडक्या बाप्पाचे हर्षाेल्हासात आगमन..सर्वत्र गणपती बाप्पा माेरयाचा जय जयकार, ढाेल,ताशे, गुलालाची उधळण
अकाेला: पश्चिम विदर्भात ढाेल,ताशे, गुलालाची उधळण करीत मंगळवारी गणेशाेत्सवाला सुरूवात झाली असून,मनाेभावे विघ्नहर्ता गणरायाची प्राण प्रतिष्ठापना केली जात आहे.
सकाळपासूनच घरगुती गणपती आणण्यासाठी अकाेला,वाशिम व बुलढाणा जिल्ह्यातील रस्ते गर्दीने फुलून गेले आहेत़ अकाेला शहरात क्रिकेट क्लब मैदानावरून आपल्या लाडक्या गणरायाला आणण्यासाठी भाविकांची गर्दी बघावयास मिळाली. गणरायाच्या स्वागतादरम्यान गणपती बाप्पा माेरयाचा जय जयकार, ढाेल,ताशे,पारंपारिक वाद्याने अकाेला शहर निनादून गेले.
मंगळवारी सकाळपासूनच क्रिकेट क्लब मैदान,जठारपेठ,काैलखेड,तुकाराम चाैक, जुने शहर,आदी भागातून घरगुती गणपती आणण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. दुचाकी, चारचाकी वाहने,ऑटाे रिक्षा, हातगाडे, ट्रॅक्टरमधून वाजत गाजत गणरायाचे आगमन होत आहे.
तगडा पोलिस बंदोबस्त
गणेश आगमनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा व शहरातील प्रमुख चौकांसह बाजारपेठेत पोलिस बंदोबस्त तैनात केला असून, अकाेला शहरात अपर पोलिस अधीक्षक १, पोलिस उपअधीक्षक ७, पोलिस निरीक्षक २३, सहायक पोलिस निरीक्षक २८, पोलिस उपनिरीक्षक ७१, पोलिस कर्मचारी २०५०, होमगार्ड ७००, एसआरपी प्लाटून २, आरसीपी प्लाटून ४, क्युआरटी प्लाटून १ असा एकूण ३२०० पोलिसांचा फौजफाटा प्रमुख मार्गांसह शहरात तैनात केला आहे.
ड्रोन, सीसी कॅमेऱ्यांद्वारे वॉच
गणपती बाप्पाच्या आगमनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये. या दृष्टिकोनातून पोलिस ८ ड्रोन कॅमेऱ्यासह सीसी कॅमेऱ्यांसह आक्षेपार्ह हालचालींवर वॉच आहे. यासोबतच सायबर क्राईम पोलिससुद्धा सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडीओ, छायाचित्रांवर लक्ष ठेवून आहेत.