प्रसूती रजेवर असताना केली धनादेशावर स्वाक्षरी!
By Admin | Updated: April 8, 2017 01:49 IST2017-04-08T01:49:20+5:302017-04-08T01:49:20+5:30
निंभोरा येथील ग्रामसेविकेचा प्रताप

प्रसूती रजेवर असताना केली धनादेशावर स्वाक्षरी!
वल्लभनगर : प्रसुती रजेवर असतानाही ठेकदाराला ४ लाख १७ हजार ७६० रुपयांच्या धनादेशावर स्वाक्षरी केल्याचा प्रताप निंभोरा गट ग्रामपंचायतच्या सचिव आर.डी.तळवी यांनी केल्याचे समोर आले आहे. सरपंच व ग्रामसेवकाने अपहार केला असून, त्याची चौकशी करण्याची मागणी उपसरपंचासह सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. मागणी मान्य न झाल्यास १ मे रोजी उपोषण करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.
निंभोरा येथे पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या आवार भिंतीचे बांधकाम करण्याकरिता ग्रामपंचायतने ठराव घेतला होता. त्यानुसार जिल्हा वार्षिक योजना पशुसंवर्धन सन २०१५-१६ नुसार निविदा रक्कम ९,०३,१२६ अंदाजपत्रक दराने प्रशासकीय मान्यता मिळून तांत्रिक मंजुरी देण्यात आली होती; तसेच हे काम पूर्ण करण्याचा कालावधी ३१ मार्च २०१६ होता.
सदर निधी हा ३१ मार्च २०१६ पूर्वी खर्च करावयाचा होता, त्यामुळे सदर काम विहीत मुदतीत पूर्ण करणे बंधनकारक होते व मुदतवाढ मिळणार नाही, असे वर्कआॅर्डरमध्ये स्पष्टपणे नमूद होते. ते काम मुदतीत पूर्ण झाले नाही. त्या कामात भ्रष्टाचार झाल्याबाबत व अनियमितता चालू असल्याची तक्रार युवा सेना ता. अध्यक्ष संतोष भगत व उपसरपंच पद्माकर लांडे यांनी २ मे १६ ला जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी व बांधकाम विभागाला दिली होती.त्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. ३० मार्च २०१७ ला या बांधकामाबाबत गट ग्रामपंचायत निंभोराला ४,१७,७६० रुपयांचा धनादेश मिळाला. या धनादेशावर ८ मार्च २०१७ पासून १८० दिवसांच्या प्रसूती रजेवर गेलेल्या ग्रामसेविका आर.डी.तळवी यांनी ३० मार्च २०१७ रोजी स्वाक्षरी केली. वास्तविक पाहता तळवी सुटीवर असल्यामुळे निंभोरा ग्रामपंचायतचा प्रभार हा ३० मार्च रोजी गटविकास अधिकाऱ्यांनी आर.एस.गरकल यांच्याकडे सोपवला होता.
तरीही तडवी यांनी ठेकेदार सावंग यांचे देयक काढण्यासाठी सुटीवर असतानाही स्वाक्षरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये अपहार झाल्याचा आरोप करून चौकशी करण्याची मागणी उपसरपंच पद्माकर लांडे व सदस्य मीना गावंडे, चंदा भुईभार, शोभा लांडे व संतोष भगत यांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. व गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. मागणी मान्य न झाल्यास १ मे रोजी उपोषण करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.
दरम्यान, याप्रकरणी ग्रामसेवक आर.डी. तळवी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.
ग्रामसेविका तडवी सध्या सुटीवर आहेत. त्यांना कॉल करण्याचा प्रयत्न केला असता, त्या कॉल उचलत नाहीत. चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करू.
- गजानन वेले, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, अकोला.