श्रीविष्णू तोष्णीवाल स्मृती टी-२0 क्रिकेट स्पर्धा; नागपूर व अमरावती संघ विजयी
By Admin | Updated: January 14, 2015 00:12 IST2015-01-14T00:12:00+5:302015-01-14T00:12:00+5:30
घरच्या मैदानावर अकोला संघ पराभूत; अक्षय व नयनची प्रेक्षणीय फलंदाजी.

श्रीविष्णू तोष्णीवाल स्मृती टी-२0 क्रिकेट स्पर्धा; नागपूर व अमरावती संघ विजयी
अकोला : श्रीविष्णू तोष्णीवाल स्मृती टी-२0 क्रिकेट स्पर्धेतील तिसर्या दिवशी मंगळवारी नागपूरची प्रवीण हिंगणीकर क्रिकेट अकादमी व अमरावतीचे श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ या संघांनी आपआपने सामने जिंकले. हे सामने अकोला क्रिकेट क्लब मैदानावर खेळण्यात आले. घरच्या मैदानावर अकोलाच्या दोन्ही संघांना मात्र पराभव पत्करावा लागला.
सकाळच्या सत्रात नागपूरची हिंगणीकर क्रिकेट अकादमी व अकोला क्रिकेट क्लब यांच्यात सामना झाला. नागपूर संघाने प्रथम फलंदाजी करीत २0 षटकांत ६ बाद १४0 धावांचे लक्ष्य अकोला संघासमोर ठेवले. सलामीचा फलंदाज सर्वेश हिंगणीकर याने २५ धावा काढल्या. त्याला आकाश झा याने ९ धावांची साथ दिली. आकाश बाद झाल्यानंतर अक्षय कोल्हारे मैदानात उतरला. अक्षयने प्रेक्षणीय फलंदाजी करीत अर्धशतक झळकाविले. अक्षयच्या ५३ धावा संघाच्या विजयासाठी महत्वपूर्ण ठरल्या. अभिग्यान सिंहने २३ धावांचे योगदान दिले. अकोलाच्या आनंद हातोले, कुशल काकड यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. शारीक खान, मयूर बढे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरात अकोला संघाचे पहिले चार फलंदाज एकापाठोपाठ तंबूत परतले. शारीक खानच्या ४६ आणि सुमेध डोंगरेच्या २१ धावा याव्यतिरिक्त एकही फलंदाज नागपूरच्या वेगवान गोलंदाजीसमोर टिकू शकला नाही. अक्षय झा याने अकोल्याचे तीन गडी बाद केले. अभिग्यान सिंह व समीर देशमुख यांनी प्रत्येकी दोन गडी टिपले. अकोला संघ १९.४ षटकांत सर्वबाद ११९ धावा काढू शकला.
दुपारच्या सत्रात अकोल्याची जिल्हा हौशी क्रिकेट संघटना व अमरावती संघात सामना खेळविण्यात आला. अकोला संघाने प्रथम फलंदाजी करीत १९.५ षटकांत सर्वबाद ११0 धावा काढल्या. भरवशाचा फलंदाज नयन चव्हाण याने आपल्या नावाला साजेशी खेळी करीत ६0 धावा काढल्या. पवन परनाटे याने २४ धावांचे योगदान दिले. अमरावती संघाकडून व्हीनस प्रताप व एन. एन. शुभनामन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. राहुल चिखलकर, स्वप्निल, सतीश कुमार यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. अमरावती संघाने प्रत्युत्तरात धडाकेबाज फलंदाजी करीत १७.१ षटकांत ५ बाद ११२ धावा काढून सामना जिंकला. संदीप मोरे ३७ व स्वप्निलच्या ३३ धावा राहिल्या. इम्रान, मोहित व रूपमने उत्तम गोलंदाजी केली.