खांद्याला खांदा लावून लढणारेच आता एकमेकांच्या विरोधात!
By Admin | Updated: September 28, 2014 01:00 IST2014-09-28T01:00:57+5:302014-09-28T01:00:57+5:30
अकोला जिल्ह्यातील दिग्गजांची परीक्षा : मतविभाजन टाळण्यासाठी लागणार कस

खांद्याला खांदा लावून लढणारेच आता एकमेकांच्या विरोधात!
अकोला- तीन महिन्यांपूर्वीच लोकसभा निवडणुकीत खांद्याला खांदा लावून लढणार्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी एकमेकांच्या विरोधात नामनिर्देशनपत्र दाखल केले. त्यामुळे यावेळी दिग्गजांच्या लढती अनुभवयास मिळणार आहे.
लोकसभा निवडणुकीपर्यंत राज्यात भाजप-शिवसेना आणि मित्र पक्षांची महायुती होती. काँग्रेस आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांचा समावेश होता. लोकसभा निवडणुकीदरम्यान आलेल्या कटू अनुभवांमुळे सर्वच पक्षांनी स्वतंत्र लढण्याबाबत चाचपणी सुरू केली होती. त्यातूनच विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपावरून झालेल्या मतभेदामुळे युती आणि आघाडीचे राजकारण संपुष्टात आले. आघाडी आणि युती फुटल्यामुळे लोकसभेत खांद्याला खांदा लावून लढणार्या नेत्यांनाच या पक्षांनी उमेदवारी दिली. अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार संजय धोत्रे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेनेचे नेते माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे आणि भाजपचे माजी राज्यमंत्री गोवर्धन शर्मा खांद्याला खांदा लावून आले होते. शनिवारी गोवर्धन शर्मा आणि गुलाबराव गावंडे यांनी अकोला पश्चिममधून एकमेकांच्या विरोधात नामनिर्देशनपत्र दाखल केले. हीच परिस्थिती अकोला पूर्व मतदारसंघातही होती. काँग्रेसचे हिदायत पटेल यांच्यासाठी अर्ज भरताना सहकार गटातील नेते एकत्र आले होते. यावेळी सहकार गटातीलच शिरिष धोत्रे आणि डॉ. सुभाष कोरपे यांनी एकमेकांच्या विरोधात अर्ज भरले. भाजपचे जिल्हा सरचिटणीस रणधिर सावरकर आणि शिवसेनेचे आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून एकमेकांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. आकोटमध्ये महेश गणगणे यांनी काँग्रेसकडून तर राजीव बोचे यांनी राकाँकडून नामनिर्देशपत्र दाखल केले. आ. संजय गावंडे यांना शिवसेनेने पुन्हा रिंगणात उतरविले, तर भाजपने प्रकाश भारसाकळे यांना उमेदवारी दिली. बाळापूरमध्ये काँग्रेसचे नातिकोद्दिन खतीब यांच्याविरोधात राकाँने अल्पसंख्याक समाजातील पातूरचे शहर अध्यक्ष हिदायत खाँ रुनका यांना उमेदवारी दिली. येथे काँग्रेसचे नेते नारायण गव्हाणकर यांनीही अपक्ष उमेदवारी दाखल केली. जिल्ह्यातील दिग्गज नेते एकमेकांसमोर उभे ठाकल्याने, मतविभाजन टाळण्यासाठी दिग्गजांचा कस लागणार आहे.
गुरू शिष्य रिंगणात
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने अकोला पश्चिम मतदारसंघातून गुरु आणि शिष्य एकमेकांच्या विरोधात उभे झाले आहेत. माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी शिवसेनेतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. कधीकाळी गावंडे यांचे निकटवर्तीय आणि त्यांचे शिष्य म्हणून ओळखल्या जाणारे विजय देशमुख यांना काँग्रेसने तिकिट नाकारल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.
***दार, जिल्हाध्यक्षांची परीक्षा
खासदार संजय धोत्रे यांनी त्यांच्या गटातील कार्यकर्त्यांना तिकिट मिळावे यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. आता युती फुटल्यामुळे त्यांना मतांचे विभाजन टाळून उमेदवार निवडून आणण्याचे आव्हान पेलावे लागेल. सर्वच पक्षांच्या जिल्हाध्यक्षांची कसोटीही या निवडणुकीत लागणार आहे.