शिक्षणासाठी पैसे नसल्याने अल्पभूधारक शेतकरी पुत्राची आत्महत्या
By Admin | Updated: April 23, 2016 02:27 IST2016-04-23T02:27:05+5:302016-04-23T02:27:05+5:30
दुष्काळदाह: अकोला जिल्ह्यातील मन सुन्न करणारी घटना.

शिक्षणासाठी पैसे नसल्याने अल्पभूधारक शेतकरी पुत्राची आत्महत्या
बबन इंगळे, सायखेड (जिल्हा अकोला)
घरी अवघी एक एकर शेती.. अशातच गत तीन वर्षांपासून नापिकी.. संसाराचा गाडा ओढण्यासाठी पित्याची आधीच होत असलेली ओढाताण.. अशा परिस्थितीत शिक्षणासाठी पैसा कुठून येईल. अशा नाना प्रश्नांच्या चिंतेतून इयत्ता नववीच्या एका शेतकरी पुत्राने स्वत:चे जीवन संपविले. दुष्काळाची दाहकता दर्शविणारी आणि मन सुन्न करणारी घटना अकोला जिल्ह्यातील बाश्रीटाकळी तालुक्यातील पुनोती गावात गुरुवारी घडली. आकाश मधुकर मंजुळकर हे मृत्यूला कवटाळलेल्या मुलाचे नाव आहे.
अकोला जिल्ह्यातील शेतकर्यांना सतत तीन वर्षांपासून दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. कर्ज काढून पिके घ्यायची, प्रसंगी संपूर्ण कुटुंब शेतात राबायचे; मात्र हंगामाच्या शेवटी मशागत व लागवडीचाही खर्चही निघणार नाही, एवढे पीक होत आहे. अशीच काहीशी परिस्थिती मधुकर मंजुळकर यांची आहे. त्यांच्याकडे अवघी एक एकर कोरडवाहू शेती. शेती असून नसल्यासारखीच असल्याने त्यांनी गवंडी काम पत्करले. परिस्थितीशी दोन हात करीत मोठी मुलगी अंजना हिचा विवाह केला. लहान मुलगी अनिता व एकुलता एक मुलगा आकाश यांना शिक्षित करावे, यासाठी त्यांनी कंबर कसली; मात्र त्यांचा मुलगा आकाशकडून कुटुंबातील सदस्यांची होत असलेली ओढाताण पाहवल्या गेली नाही. गुरुवार, १४ एप्रिल रोजी त्याने शेतातच विष प्राशन करून जीवनाला पूर्णविराम दिला. इवल्याशा आकाशचे असे जाणे, सर्वांच्याच मनाला चटका लावून गेले.
शिक्षणाचा ध्यास
मंजुळकर कुटुंब हे वडार समाजाचे असून, पूर्वी या समाजात शिक्षणाचा अभाव होता. स्पर्धेच्या युगात आपली मुले मागे राहू नयेत, आपल्या वाट्याला आलेल्या कष्टाचे चटके मुलांना बसू नये, यासाठी मधुकर मंजुळकर व त्यांची पत्नी मंगला यांनी मुलांना शिक्षित करण्याचा निर्धार केला. त्यासाठी मिळेल ते काम पत्करले. अशा स्थितीत त्यांच्या मुलाच्या जाण्याने समाजमन सुन्न झाले आहे.
कुटुंबावर शोककळा
लाडात वाढलेला आकाश हा मंजुळकर कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. समृद्धीचे, उच्च शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगण्यासारख्या, कोवळ्या वयातच आकाशने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने मंजुळकर कुटुंबावर दु:खाचा डोंगरच कोसळाला. या घटनेच्या वेळी आकाशचे वडील हे बाहेरगावी गवंडी काम करण्यासाठी गेले होते. ही वार्ता समजताच त्यांना प्रचंड धक्का बसला. कुटुंबाचा आक्रोश पाहून, संपूर्ण गाव हळहळले.