‘स्वाइन फ्लू’वरील औषधांचा तुटवडा
By Admin | Updated: February 19, 2015 02:12 IST2015-02-19T02:12:03+5:302015-02-19T02:12:03+5:30
खासगी औषध विक्रेत्यांकडेही औषधी नसल्याचे पुणे सहसंचालकांचे पत्र.

‘स्वाइन फ्लू’वरील औषधांचा तुटवडा
सचिन राऊत/ अकोला: स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव ८ ते ९ जिल्हय़ांमध्ये झाला असून, या आजाराने आतापर्यंत ५६ जणांचा बळी घेतला; मात्र अशा भीषण परिस्थितीतही राज्यातील शासकीय रुग्णालयांसह खासगी औषधी विक्रेत्यांकडे स्वाइन फ्लूवरील औषधांचा तुटवडा असल्याची माहिती समोर आली आहे. आरोग्य सहसंचालकांनी स्वाइन फ्लूवरील प्रतिबंधात्मक औषधींचा साठा करण्याचे आदेश ९ फेब्रुवारी रोजीच दिले होते, हे विशेष. राज्यातील खासगी औषधी विक्रेत्यांकडेही ह्यस्वाईन फ्लूह्णवरील प्रतिबंधात्मक औषधी पाहीजे त्या प्रमाणात उपलब्ध नसून, अशी औषधी दुकाने शोधून त्याची यादी आरोग्य विभागाकडे तयार ठेवावी, असे सहसंचालकांनी स्पष्ट केले आहे.
राज्यात ८ ते ९ जिल्हय़ांमध्ये ह्यस्वाइन फ्लूह्णची लागण झाली असून, सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण नागपूरनंतर पुणे, अमरावती, सोलापूर, नाशिक, लातूर, चंद्रपूर, वाशिम आणि अकोल्यात आढळून आले आहेत. अवघ्या १0 ते १५ दिवसांच्या कालावधीत स्वाइन फ्लूने राज्यात ५६ जणांचा बळी घेतला असून, योग्य उपचार तातडीने न मिळाल्याने त्यांचा बळी गेल्याचे समोर आले आहे. त्यामुळे स्वाइन फ्लूच्या रुग्णांना अत्यावश्यक सेवेसह प्रतिबंधात्मक औषधी तातडीने उपलब्ध व्हावीत, यासाठी आरोग्य सहसंचालकांनी ९ फेब्रुवारी रोजी आरोग्य उपसंचालक, वैद्यकीय अधिष्ठाता, जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांना पत्र पाठविले.
खासगी औषधी विक्रेत्यांकडे ही औषधी उपलब्ध असल्यास त्यांची एक यादी तयार करण्याचे आदेश सहसंचालकांनी त्या पत्राद्वारे दिले होते.
ही यादी जिल्हा आरोग्य विभागाकडे सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले होते; मात्र त्यानंतरही जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य उपसंचालक आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी स्वाइन फ्लूवरील औषधींच्या उपलब्धतेबाबत कोणत्याही हालचाली केल्या नाही.