पाणी पुरवठा योजनांसाठी ‘ब्लिचिंग पावडर’चा तुटवडा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 10:47 IST2020-05-11T10:46:54+5:302020-05-11T10:47:08+5:30
जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून उसनवारीवर ‘ब्लिचिंग पावडर’ घेऊन पाणी निर्जंतुकीकरणाची गरज भागविली जात आहे.

पाणी पुरवठा योजनांसाठी ‘ब्लिचिंग पावडर’चा तुटवडा!
- संतोष येलकर
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : ‘लॉकडाउन’मध्ये जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत जिल्ह्यातील पाच प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांद्वारे निर्जंतुक पाणी पुरवठा करण्यासाठी ‘ब्लिचिंग पावडर’चा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून उसनवारीवर ‘ब्लिचिंग पावडर’ घेऊन पाणी निर्जंतुकीकरणाची गरज भागविली जात आहे.
जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत जिल्ह्यात कारंजा रमजानपूर, लोहारा, वझेगाव, खांबोरा ६० गावे व खांबोरा ४ गावे इत्यादी पाच प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत गावांना पाणी पुरवठा करण्यात येतो.
या योजनेंतर्गत पाणी पुरवठ्याच्या निर्जंतुकीकरणासाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत ‘ब्लिचिंग पावडर’चा पुरवठा करण्याचा आदेश संबंधित पुरवठादारास देण्यात आला; मात्र कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लागू असलेल्या ‘लॉकडाउन’मध्ये ‘ब्लिचिंग पावडर’चा पुरवठा अद्याप होऊ शकला नाही.
त्यामुळे ‘ब्लिचिंग पावडर’चा तुटवडा निर्माण झाल्याने, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अकोला विभागीय कार्यालयाकडून उसनवारीवर १५० बॅग ‘ब्लिचिंग पावडर’ घेऊन जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत पाच प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांतर्गत पाणी पुरवठ्याच्या निर्जंतुकीकरणासाठी ‘ब्लिचिंग पावडर’ची गरज भागविली जात आहे.
जिल्ह्यातील पाच प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांतर्गत पाणी पुरवठ्याच्या निर्जंतुकीकरणासाठी ‘ब्लिचिंग पावडर’चा पुरवठा आदेश दिला होता; मात्र लॉकडाउनमुळे पुरवठादाराकडून ‘ब्लिचिंग पावडर’चा पुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे मजीप्राकडून उसनवारीवर ‘ब्लिचिंग पावडर’ घेण्यात आली आहे.
-किशोर ढवळे, कार्यकारी अभियंता,
जि. प. ग्रामीण पाणी पुरवठा विभाग.