विजय शिंदे
अकोट : आग लागल्यानंतर ती नियंत्रणात आणण्याची जबाबदारी असलेले फायर ऑडिट करणारे अकोट नगर परिषदेमधील अग्निशमन कार्यालयच सीलबंद केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. विशेष म्हणजे कार्यालयाला हे सील अग्निशमन अधिकाऱ्यांनी ठोकून ते सुट्टीवर निघून गेले आहेत.
भंडारा जिल्ह्यात दहा काेवळ्या बालकांचा आगीमुळे दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने फायर ऑडिट करण्याचे आदेश जारी केले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी म्हणून अकोला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अशा सर्व शासकीय आरोग्य संस्थांचे इलेक्ट्रिक, स्ट्रक्चरल व फायर ऑडिट लवकरात लवकर पूर्ण करावे, असे निर्देश दिले आहेत. दरम्यान, अकोट नगर परिषदेच्या अग्निशमन कार्यालयाला मात्र कुलूप लावून सीलबंद केल्याचे आढळून आले आहे. याबाबत अधिक माहिती मिळवली असता खुद्द अग्निशमन अधिकारी यांनीच ६ जानेवारी रोजी पालिकेचा शिक्का व स्वाक्षरीनिशी कुलूपबंद सील केल्याचे समजले. अकोट नगर परिषदेकडे एकच अग्निशमन दलाचे वाहन आहे. शहरात, तालुक्यात किंवा जिल्ह्यातील आग लागल्यानंतर या वाहनाचा आवश्यकतेनुसार वापर केला जातो, तर अग्निशमन वाहनाचे साहित्यासह इतर दस्तावेज ठेवण्यासाठी अग्निशमन कार्यालय नगर परिषद उघडले आहे. या अग्निशमन कार्यालयावरच फायर ऑडिट करण्याची जबाबदारी आहे; परंतु चक्क ६ जानेवारीपासून कार्यालय सीलबंद करण्यात आले आहे. मुख्याधिकारी व इतर जबाबदार अधिकारी, कर्मचारी, नगराध्यक्ष, नगरसेवक असताना नगर परिषद आवारातील अग्निशमन कार्यालय सीलबंद आढळल्याने या मनमानी कारभाराबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. दुसरीकडे फायर ऑडिट करण्यासाठी अग्निशमन सेवा विभागाने अधिसूचित संस्थांकडून विहित प्रक्रियेचा अवलंब करून पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. अशा बिकटस्थितीत अग्निशमन कार्यालयच सीलबंद असल्याने या गंभीर घटनेमुळे प्रशासनाचे वाभाडे निघत आहेत. फायर ऑडिटसह आगीपासून हानी टाळण्यासाठी अग्निशमन विभाग हा जागृत व संवेदनशील मानला जातो. परंतु राज्यात भंडारा येथे भीषण घटना घडल्यानंतरही अग्निशमन कार्यालय सीलबंद राहत असल्याने या गंभीर घटनेच्या चौकशीचा विषय ऐरणीवर आला आहे.