शिवसेनेचे रुमणे आंदोलन आता जिल्हाभरात
By Admin | Updated: May 29, 2017 01:49 IST2017-05-29T01:49:14+5:302017-05-29T01:49:14+5:30
पूर्वतयारीसाठी खासदार अरविंद सावंत अकोल्यात

शिवसेनेचे रुमणे आंदोलन आता जिल्हाभरात
अकोला : शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळावी, यासाठी आग्रही भूमिका घेतलेल्या शिवसेनेने बाळापूर तालुक्यानंतर आता संपूर्ण जिल्ह्यात रुमणे आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. आंदोलनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी शिवसेनेचे पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख तथा खासदार अरविंद सावंत सोमवारी अकोल्यात दाखल होत आहेत.
शेतकऱ्यांनी पिकवलेल्या सोयाबीन, तुरीला हमीभाव तर सोडाच, त्यांचा शेतमाल खरेदी करण्यासाठी राज्य सरकार पूर्णत: अपयशी ठरल्याचे चित्र आहे. परिणामी, भरघोस उत्पन्न होऊनदेखील कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर पुन्हा कर्जाचा डोंगर उभा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी नको, तर कर्जमुक्ती देण्याची मागणी करीत शिवसेनेने भाजपावर तीव्र हल्ला चढवल्याचे चित्र आहे. कर्जमुक्तीच्या मागणीसाठी संपर्क प्रमुख खा. अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली बाळापूर तालुक्यात रुमणे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी काढलेल्या मोर्चाची दखल घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण जिल्ह्यात रुमणे मोर्चाचे आयोजन करण्याचे आदेश दिले आहेत. त्या पृष्ठभूमीवर संपर्क प्रमुख अरविंद सावंत मोर्चाचे नियोजन करण्यासाठी सोमवारी सकाळी अकोल्यात दाखल होत आहेत.
या अगोदर काढण्यात आलेल्या रूमणे मोर्चाला शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. शेतकऱ्यांसमोर अनंत अडचणी असून त्यांनी उत्पादीत केलेल्या शेतमालाला भाव तर नाहीच शिवाय शेतकऱ्यांची अडवणूकही केली जात आहे. त्यांच्या या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी शिवसेनेने रूमणे मोर्चाचे आयोजन केले आहे. आता रूमणे मोर्चाचे नियोजन करण्यात आले असून ते आता जिल्हाभर राबविले जाणार आहे.
तीन तालुक्यांत निघणार मोर्चा
बाळापूर तालुक्यानंतर शिवसेनेचा रुमणे मोर्चा आता अकोट, मूर्तिजापूर आणि अकोला तालुक्यात काढल्या जाणार आहे. त्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, उपजिल्हाप्रमुख बंडूभाऊ ढोरे, रवींद्र पोहरे, दिलीप बोचे, मुकेश मुरूमकार, निवासी उपजिल्हाप्रमुख गोपाल दातकर तसेच सर्व तालुका प्रमुख कामाला लागले आहेत.
शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानानंतर आम्ही शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ‘मी कर्जमुक्त होणारच’ अभियान सुरू केले आहे. सरकार शेतकऱ्यांच्या समस्या गांभीर्याने घेत नसले, तरी शिवसेनेला याची जाण आहे.
-अरविंद सावंत,
संपर्क प्रमुख शिवसेना.