शिवसेनेचे धनुष्य भाजपाला पेलवेना
By Admin | Updated: September 19, 2014 23:13 IST2014-09-19T23:13:49+5:302014-09-19T23:13:49+5:30
महायुतीमध्ये तणाव : बुलडाणा जिल्ह्यात भाजपपेक्षा सेनाच वरचढ

शिवसेनेचे धनुष्य भाजपाला पेलवेना
राजेश शेगोकार / बुलडाणा
तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मतांच्या माळा असे सुर आळवित गेल्या २५ वर्षापासुन एकसंघ असलेल्या भाजपा-सेना युतीचा संसार आता फुटींच्या उबंरठयावर येऊन ठेपला आहे. गेल्या २५ वर्षात एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करणार्या या दोन्ही पक्षांपैकी आता भाजपाला लोकसभेतील विजयाने शतप्रतिशतचे वेध लागले आहे त्यामुळेचे महायुतीची मने दूंभगली असुन आता मते विभाजीत होण्याकडे वाटचाल सुरू आहे या पृष्ठभूमीवर बुलडाणा जिल्ह्यातील या दोन्ही पक्षांच्या ताकदीचा आढावा घेतला असता भाजपा पेक्षा शिवसेनेचा पुढे असल्याचे स्पष्ट होते. घाटावर सेनेचे तर घाटाखाली भाजपाचे प्राबल्य असले तरी सेना ही भाजपापेक्षाही आक्रमक असल्याने सेनेच्या धुनष्याचे ओझे भाजपाला पेलेवेना अशी स्थिती झाली आहे.
बुलडाण्यातील १३ पंचायत समिती पैकी सेनेकडे बुलडाणा व मेहकर या दोन तर भाजपाकडे संग्रामपूर, जळगाव जामोद व नांदूरा या तिन पंचायत समिती आहेत मात्र सदस्यांचा विचार केला तर सेनेकडे २१ व भाजपाकडे १९ सदस्य आहेत. अशीच स्थिती जिल्हा परिषदेत आहे. जिल्हा परिषदेत सेनेचे १२ सदस्य असून विरोधी पक्षनेतेपदही सेनेकडेच आहे भाजपाला मात्र केवळ ४ सदस्यांवर समाधान मानावे लागले आहे. नगरपालीका क्षेत्रात भाजपा सेनेपेक्षा पुढे असली तरी ग्रामिण भागात सेनेची पकड भाजपापेक्षाही मजबुत आहे. पालीकेतील एकूण नगरसेवकांपैकी भाजपकडे ५१ तर सेनेकडे ३९ सदस्य आहेत. विशेष म्हणजे पालीकेच्या सत्ता कारणात भाजपा सेनेने अनेकदा परस्पर विरोध भूमिका घेऊन एकमेकांना शह दिला आहे.