शिवभक्तांचा एकच गजर ‘हर्रऽऽ बोला महादेव.’.

By Admin | Updated: August 31, 2015 01:49 IST2015-08-31T01:49:55+5:302015-08-31T01:49:55+5:30

धारगड यात्रेचा उत्साह कायम, शिवभक्तांची संख्या मात्र रोडावली.

Shiva Bhakta's single alarm 'Har bhaaa Mahadev'. | शिवभक्तांचा एकच गजर ‘हर्रऽऽ बोला महादेव.’.

शिवभक्तांचा एकच गजर ‘हर्रऽऽ बोला महादेव.’.

अकोला : दरवर्षी श्रावणातल्या तिसर्‍या सोमवारी धारगड येथे यात्रा भरते. धारगडला जाणारे बहुतांश शिवभक्त आकोटपर्यंतचा प्रवास रेल्वेने करतात. पूर्वीच्या तुलनेत रेल्वेने प्रवास करणार्‍या शिवभक्तांची संख्या रोडावली असली तरी, तो उत्साह कायम ठेवत शेकडो शिवभक्त रविवारी दुपारी १ वाजता व सायंकाळी ७ वाजता महू पॅसेंजरने आकोटकडे रवाना झाले. आकोट तालुक्यातील मेळघाट वनपरिक्षेत्रात असलेल्या धारगड येथील जागृत महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेण्यासाठी हजारो शिवभक्त अकोल्यावरून मीटरगेजवरून धावणार्‍या महू पॅसेंजरने आकोटपर्यंतचा प्रवास करतात. रविवारी दुपारी १ वाजता व सायं. ७ वाजता दक्षिण मध्य रेल्वेच्या अकोला रेल्वे स्थानकावरून निघालेल्या महू पॅसेंजरने शेकडो शिवभक्त धारगडकडे रवाना झाले. गेज परिवर्तनापूर्वी महू पॅसेंजर थेट पूर्णावरून सुटत असल्याने वाटेतल्या सर्व लहान-मोठय़ा गावांतील शिवभक्त धारगडला जाण्यासाठी या गाडीमध्ये गर्दी करायचे. परिणामी जागा मिळत नसल्याने हजारो शिवभक्त गाडीच्या टपावरून प्रवास करायचे. मात्र, अकोला-पूर्णा गेज परिवर्तनानंतर हे चित्र बदलण्यास प्रारंभ झाला. शिवभक्तांचा उत्साह कायम असला तरी, महू पॅसेंजरने धारगडला जाणार्‍या शिवभक्तांची गर्दी मात्र रोडावत चालली आहे. रविवारी दुपारी गाडी निघण्यापूर्वी काही अतिउत्साही शिवभक्तांनी गाडीच्या टपावर बसून जल्लोष केला. गाडी निघाल्यानंतरदेखील टपावर बसलेल्या शिवभक्तांचा उत्साह कायम होता. या धोकादायक प्रकारावर नियंत्रण मिळविण्यासाठी दक्षिण-मध्य रेल्वेचा एकही सुरक्षा रक्षक स्थानकावर उपस्थित नसल्याचे दिसून आले. लांब शिटी देत व धूर उडवित महू पॅसेंजर ७ नंबरच्या फलाटावरून रवाना झाली. रेल्वे मार्गावर ठिकठिकाणी उभे असलेल्या शिवभक्तांमुळे नायगाव भागात पोहोचेपर्यंत ही गाडी अनेक ठिकाणी थांबवावी लागली. या भक्तांना घेत गाडी आकोटकडे रवाना झाली. सायंकाळी ७ वाजता निघालेल्या गाडीच्या वेळेसदेखील हेच वातावरण पहावयास मिळाले.

Web Title: Shiva Bhakta's single alarm 'Har bhaaa Mahadev'.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.