शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे सोमवारी अकोल्यात
By Admin | Updated: May 9, 2017 02:56 IST2017-05-09T02:56:07+5:302017-05-09T02:56:07+5:30
शिवसंपर्क अभियान ; चार जिल्ह्यांचा घेणार आढावा.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे सोमवारी अकोल्यात
अकोला: शेतकर्यांच्या समस्या जाणून घेण्यासोबतच त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे येत्या १५ मे रोजी अकोल्यात दाखल होत आहेत. अकोला, बुलडाणा, अमरावती या तीन जिल्ह्यांचा आढावा यावेळी घेण्यात येईल.
राज्य सरकारमध्ये सहभागी असणार्या शिवसेनेने सुरुवातीपासूनच विरोधी पक्षाची भूमिका घेत भाजपला जेरीस आणल्याचे दिसून येते. शेतकर्यांच्या ज्वलंत प्रश्नांना घेऊन शिवसेनेने उभारलेल्या आंदोलनांमुळे विरोधी पक्ष काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची अनेकदा कोंडी झाल्याचे समोर आले आहे. शेतकर्यांची कर्जमुक्ती व्हावी यासोबतच तूर खरेदीच्या विषयावरून सेनेने भाजप सरकारवर अनेकदा निशाणा साधला आहे. प्रत्येक जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात प्रत्यक्षात जाऊन पक्षाची मजबूत बांधणी करण्यासह शेतकर्यांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसंपर्क अभियानाला सुरुवात केली आहे.
शिवसंपर्क अभियानाला मराठवाड्यातून सुरुवात करण्यात आली असून, पक्ष प्रमुखांनी आठ जिल्ह्यांचा आढावा घेतला. येत्या १५ मे (सोमवार)रोजी सकाळी १0 वाजता उद्धव ठाकरे अकोल्यात दाखत होत आहेत. यादरम्यान, अकोला, बुलडाणा आणि अमरावती या तीन जिल्ह्यांचा आढावा घेण्यात येईल. त्यानंतर दुपारी ३ वाजता आयोजित पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका विशद केली जाणार आहे.
शेतकर्यांशी साधणार संवाद
शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून विधानसभा मतदारसंघनिहाय शेतकर्यांशी संवाद साधण्यासाठी शिवसेनेचे खासदार, आमदार तसेच नगरसेवक १३ आणि १४ मे रोजी जिल्ह्यात दाखल होत आहेत. अकोला पूर्व मतदारसंघाची जबाबदारी राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर असून, अकोला पश्चिम मतदारसंघासाठी आमदार चंद्रकांत सोनवणे, अकोट मतदारसंघ- आमदार किशोर पाटील, बाळापूर मतदारसंघ-आमदार सुनील शिंदे आणि मूर्तिजापूर मतदारसंघाची जबाबदारी वाशिम जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सुधीर मोरे यांच्यावर सोपवली आहे. शेतकर्यांच्या समस्या व पक्षाचा इत्थंभूत अहवाल १५ मे रोजी उद्धव ठाकरे यांना सादर केला जाईल.
शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून पक्षाची मजबूत बांधणी करण्यासह शेतकर्यांच्या विविध समस्या प्रत्यक्षात जाणून घेण्यासाठी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे अकोला शहरात दाखल होत आहेत. आम्ही सरकारमध्ये सामील असलो तरी मुख्यमंत्री जोपर्यंत शेतकरी हिताचे निर्णय घेत नाही तोपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही.
-खासदार अरविंद सावंत
तथा पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख शिवसेना