खारपाणपट्टयात शिरपूर पटर्न राबविणार
By Admin | Updated: December 10, 2014 23:58 IST2014-12-10T23:58:29+5:302014-12-10T23:58:29+5:30
सुहास खानापूरकर यांची लोकमतशी बातचित.
_ns.jpg)
खारपाणपट्टयात शिरपूर पटर्न राबविणार
राजरत्न सिरसाट/अकोला
खारपाणपट्टयाचा विस्तार हा अमरावती विभागापुरता र्मयादीत नसून, या खार्या पाण्याचे स्त्रोत नंदूरबार जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहेत. या खार्या पाण्यावर उपाय आणि पाण्याची पातळी वाढावी, याकरीता शिरपूर भागात शास्त्रीय अभ्यासानुसार या भागातील नाल्यावर बंधारे बांधून पावसाच्या पाण्याची साठवण केल्याने भूजल पातळी वाढली असून, शेतकर्यांचा वर्षात तीन पिके घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हाच शिरपूर पॅटर्न खारपाणपट्टयात राबविल्यास या भागातील शेतकर्यांना, नागरिकांना दिलासा मिळेल, असा आत्मविश्वास शिरपूर पॅटर्नचे जनक सुहास खानापूरकर यांनी खास लोकमतशी बातचित करताना व्यक्त केला.
सुहास खानापूरकर यांनी शासनाच्या भूजल विज्ञान विभागात भूजल वैज्ञानिक म्हणून काम केले आहे. भूर्गभ जलावर त्यांचा सुक्ष्म अभ्यास आहे. त्यांच्या नोकरीच्या कालावधीत त्यांनी अनेक प्रयोग राबविले असून, सेवानवृत्तीनंतर त्यांनी जलचळवळीसाठी स्वत:ला झोकून दिले आहे.
प्रश्न- शिरपूर पॅटर्न नेमके काय आहे ?
- आपल्याकडे अनेक छोटे मोठे नाले आहेत. या नाल्यांचे खोलीकरण करू न पावसाच्या पाण्याची साठवण करण्यात आली आहे. या भागातील ५५ गावांमध्ये ३२ किलोमिटर अंतरावर १२४ बंधारे बांधण्यात आले आहेत. या बंधार्यात साठलेल्या पाण्यामुळे शिरपूर भागात ६00 फूट खोल असलेले पाणी १0 फुटावर आले असून, २0 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. त्यामुळे पावसाचे साठवलेले पाणी पिकांना संरक्षित ओलित म्हणून तर देण्यात येतच आहे, शिवाय भूगर्भातील पाण्याची पातळीही वाढली आहे.
प्रश्न- खारपाणपट्टयाचा विस्तार कुठपर्यंत आहे आणि या भागातच तो कसा तयार झाला ?
- अमरावती विभागातील खारपाणपट्टा नंदूरबारपर्यंत आहे. दीड लाख वर्षापूर्वी झालेल्या नैसर्गीक घडामोडीचा हा प्रकार आहे. समुद्राचे पाणी या भागात शिरल्याने अमरावती ते नंदूरबारपर्यंत ४00 मैल लांब आणि ४0 फूट खोल खड्डा पडला होता. कालातंराने हा खड्डा माती, गाळाने भरला. म्हणूनच या भागाला पुर्णेच्या गाळाचा प्रदेशही म्हटले जाते. समुद्राच्या पाण्याचे क्षार येथील गोड्या पाण्यात मिसळल्याने या भागातील पाणी खारे असल्याचे आतापर्यंतचे तर्क आहेत.
प्रश्न- खारपाणपट्टयात शिरपूर पॅटर्न कसा राबविणार ?
- खारपाणपट्टयात पुर्णा नदी सर्वात मोठी आहे. पुर्णा नदीला मिळणार्या लहान नाल्यावर ५00 मिटर अंतरावर एक याप्रमाणे बंधारे बांधावे लागणार आहेत. या बंधार्यांची खोली २0 फुट ठेवावी लागेल आणि १५ मिटर खोल चरही खोदावे लागतील. यात पावसाचे पाणी साठवायचे आहे.
प्रश्न- पाणी साठवून गोडे पाणी मिळणार कसे ?
- खारपाणपट्टयात एका नाल्यावर ५00 मिटर अंतरावर एक बंधारा बांधावा लागणार आहे. या बंधार्यात साठलेले पाणी जमिनीत जिरण्यास मदत होईल. हे पाणी सतत साचत गेल्याने खारे पाणी खाली जाईल आणि कालातंराने गोडे पाणी वर येईल. यात अनेक शास्त्रीय गोष्टी आहेत. या पध्दतीचे प्रयोग खारपाणपट्टयात राबविण्याचा संकल्प आहे.