अकोला मनपा आवारात कंत्राटदारांची शिवीगाळ
By Admin | Updated: April 17, 2015 01:53 IST2015-04-17T01:53:37+5:302015-04-17T01:53:37+5:30
थकीत देयकांचा मुद्दा पेटला

अकोला मनपा आवारात कंत्राटदारांची शिवीगाळ
अकोला : थकीत देयके अदा करण्याच्या मोबदल्यात अव्वाच्या सव्वा दलाली मागत असल्याचा आरोप करीत मनपा अधिकारी व पदाधिकार्यांना काही कंत्राटदारांनी प्रचंड शिवीगाळ केल्याचा प्रकार गुरुवारी मनपा आवारात घडला. अचानक घडलेल्या प्रकारामुळे अनेक कर्मचार्यांनी मनपातून काढता पाय घेणे पसंत केले. महापालिकेचे अंदाजपत्रक मंजूर नसताना प्रशासनाने कंत्राटदारांच्या थकीत रकमेपोटी १0 एप्रिल रोजी दीड कोटी रु पयांची देयके अदा केली. सदर देयके काढून देण्यासाठी काही नगरसेवकांच्या नातेवाईकांनी टक्केवारीसाठी दुकान थाटले. देयकांचा धनादेश हातात ठेवण्याच्या मोबदल्यात १५ ते २0 टक्के रक्कम कमिशनपोटी उकळण्यात आली. यामध्ये जल प्रदाय विभागातील देयकांचा सर्वाधिक भरणा होता. यादरम्यान शहरात बांधकाम विभागामार्फत मूलभूत सुविधांची कामे करणार्या कंत्राटदारांच्या हातावर मात्र तुरी देण्यात आल्या. थकीत देयक ांचा मनपात ऊहापोह झाल्यामुळे प्रशासनानेदे खील उर्वरित देयकांसाठी हात वर केले. ही बाब जिव्हारी लागलेल्या काही कंत्राटदारांनी गुरुवारी सायंकाळी मनपा आवारात वरिष्ठ अधिकार्यांसह पदाधिकारी व नगरसेवकांना प्रचंड शिवीगाळ केली. कर्ज काढून मूलभूत सुविधांची कामे केल्यानंतर प्रशासनाने देयकांसाठी टाळाटाळ चालवली. कर्जाच्या व्याजाची रक्कम वाढत असताना देयके काढून देण्यासाठी खुलेआम कमिशन मागितल्या जात असल्याचा आरोप या कंत्राटदारांनी केला. टक्केवारीच्या मुद्यावर कंत्राटदार जाहीर आरोप करीत असताना संबंधित विभागाच्या अधिकारी-कर्मचार्यांनी मनपातून काढता पाय घेणे पसंत केले.